तृतीयपंथींच्या सन्मानासाठी ठाण्यात सायकल राईड

ठाणे : तृतीयपंथींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन आयोजित ‘एक राईड तृतीयपंथींसाठी-त्यांच्या सन्मानासाठी’ ही अनोखी सायकल राईड रविवारी झाली.

या सायकल राईडमधून सायकलप्रेमीनी त्यांच्याप्रति सन्मान व्यक्त केला. त्याचप्रमाणे यावेळी सायकलिंगच्या माध्यमातून फिटनेसचे महत्त्व सांगणाऱ्या ७१ वर्षीय माजी पोलीस अधिकारी प्रवीणकुमार कुलथे यांना संस्थेतर्फे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते ‘कृतार्थ जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोपटे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कुलथे यांनी सायकलच्या टायरमध्ये अहंकाराची हवा भरू दिली नाही असे कौतुकोद्गार बल्लाळ यांनी काढले.

पोलीस निरीक्षक विनोद लभडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून गडकरी रंगायतन येथून सायकल राईडला सुरुवात झाली. तलावपाळी-राम मारुती रोड-गोखले रोड-तीन हात नाका यामार्गे निघालेली ही सायकल राईड सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय येथे झाली. यात १० वर्षीय मुलांपासून ६० वर्षांच्या आजीबाईपर्यंत सहभागी झाले होते. माय लेकी, पिता-पुत्र, गृहिणी, विद्यार्थी यांचा देखील सहभाग होता.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बल्लाळ, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विश्वस्त मानसी प्रधान, आनंद विश्व गुरुकुल प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, युवा पत्रकार अक्षय भाटकर त्याचप्रमाणे संस्थेचे सेक्रेटरी दिपेश दळवी व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबईच्या पहिल्या तृतीयपंथी टॅक्सी चालक करीना आडे, किन्नर अस्मिता मंचच्या सदस्य सिमरन सिंग, मुंबई विद्यापीठातील पहिली तृतीयपंथी पदवीधर श्रीदेवी लोंढे यांचा संस्थेतर्फे विशेष सत्कार करून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी त्यांनी आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमच्या हाताला रोजगार द्या असे आवाहन केले.

सायकलिंगमध्ये योगदान देणाऱ्या चार जणांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात कश्मिर ते कन्याकुमारी सायकलवर प्रवास करणारी ठाण्याची ११ वर्षीय सई पाटील, सायकलवर एक लाख किलोमीटर प्रवास करणाऱ्या डोंबिवलीच्या ममता परदेशी, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनकडून प्रेरणा घेऊन तब्बल २२ वर्षांनी सायकल चालविणारे पंकज कुंभार आणि वयाच्या ६० व्या वर्षीही सायकल चालविणाऱ्या दुर्गा गोरे यांचा सत्कार करण्यात आला.

मिलिंद बल्लाळ हे आपल्या मनोगतात म्हणाले की, केवळ सायकल चालवायची नाही तर त्याला सामाजिक बांधिलकीची जोड द्यायची हा आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचा उद्देश आहे. सायकलवर बसल्यावर सकारात्मकता जाणवते. प्रत्येक माणसाने सायकल चालवली तर तो ग्राउंड रुटेड राहील. प्रत्येक पिढीला जोडणारा दुवा म्हणजे सायकल आणि ही किमया इतर वाहनांमध्ये नाही. सायकल ट्रॅकचा प्रयोग ठाण्यात दुर्दैवाने अपयशी झाला अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सुरुवातीला संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी संस्थेचे उद्दिष्ट विषद केले तर सूत्रसंचालन विश्वस्त विकास धनवडे यांनी केले