मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
ठाणे: किसननगर प्रमाणेच लोकमान्यनगर विभागाचा देखील क्लस्टरच्या माध्यमातून विकास केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही लोकमान्यनगर-शास्त्रीनगर विभागातील रहिवासी आणि कार्यकर्ते यांचा दिपावली निमित्ताने कौटुंबिक स्नेहभोजन आनंद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. क्लस्टरबाबत ज्या काही अडचणी होत्या त्या नगरविकास मंत्री असताना सर्व दूर केल्या आहेत. त्यामुळे ही योजना राबविण्यास आता कोणतीही अडचण नाही असेही ते यावेळी म्हणाले.
हणमंत जगदाळे यांनी यावेळी केलेल्या प्रास्ताविक भाषणात लोकमान्यनगर विभागाचा देखील क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्याची मागणी केली. त्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात ही मागणी मान्य केली.
प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर जगदाळे यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
श्री.जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आनंद मेळाव्याला लोकमान्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला ठाकूर, माजी नगरसेवक राम रेपाळे, दिगंबर ठाकूर, योगेश जानकर व विजय पडवळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकमान्यनगर, शास्त्रीनगर विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.