मनसे युवा नेते अमित ठाकरे यांचे सुतोवाच
अंबरनाथ : गृहमंत्री पद मिळाले तरच ठाकरे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू असे सूतोवाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित संवाद दौरा कार्यक्रमात आज शुक्रवारी अमित ठाकरे यांनी अंबरनाथला भेट दिली. वडवली विभागातील रोटरी सभागृहात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, पदाधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव त्यांच्यासमवेत होते.
संवाद दौऱ्यात श्री. ठाकरे यांनी आज शुक्रवारी मुंबई ते अंबरनाथ दरम्यान लोकलने प्रवास करणे पसंत केले. शहराध्यक्ष कुणाल भोईर, धनंजय गुरव, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, अविनाश सुरसे, युसूफ शेख आदी पदाधिकाऱ्यांनी श्री. ठाकरे यांचे अंबरनाथ रेल्वे स्थानकात जल्लोषात स्वागत केले. श्री. ठाकरे यांनी प्राचीन शिवमंदिराला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्री. ठाकरे बोलत होते. मनसेला दोन मंत्रीपदे मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावरून उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना ‘गृहमंत्री पद देणार असतील तर सत्तेत सहभागी होऊ, पण ते देत नाहीत ना असा मिश्किल टोला श्री. ठाकरे यांनी लगावला. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वर्षानुवर्षे तेच प्रश्न, समस्या अजून सुटल्या नाहीत याबद्दल श्री. ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
वडवली विभागातील रोटरी सभागृहात विद्यार्थी, पदाधिकारी आदींच्या विभागनिहाय चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. शहराध्यक्ष कुणाल भोईर, शैलेश शिर्के, स्वप्नील बागुल, अपर्णा भोईर, सुप्रिया देसाई या माजी नगरसेवकांचीही मते त्यांनी जाणून घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विद्यार्थ्यांसाठी नवी संघटना स्थापन करण्यात येऊन त्याद्वारे प्रत्येक शहरातील विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे, प्रत्येक शाळा महाविद्यालयांबाहेर संघटनेचे फलक लावून त्यावर पदाधिकाऱ्यांची नावे प्रसिद्ध केली जातील, विद्यार्थ्यांना न्याय दिला जाईल, पालिका निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्याबाबतचा अहवाल मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना सादर केला जाणार असल्याचे अमित ठाकरे म्हणाले.