पावसाचा जोर वाढला; आतापर्यंत ९१४ मि. मी.पाऊस

ठाणे : पावसाचा जोर आज पुन्हा वाढला असून शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली तर पूर्व भागातील कोपरी प्रभाग समिती कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून एका गाडीचे नुकसान झाले.

पूर्व ठाण्यातील दौलतनगर येथील कोपरी प्रभाग समिती कार्यालय असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब दुपारी कोसळून खाली पार्क केलेल्या एका मारुती गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

दरम्यान आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत २६.९४ मि.मी. पाऊस पडला होता. आत्तापर्यंत ९१४.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १२७१.९६ मि.मी. पाऊस पडला होता.

शहराच्या विविध भागात झाडे उन्मळून पडण्याच्या आणि झाडाच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी झाडे आणि फांद्या दूर करून रस्ते मोकळे करून दिले.