शिवसेनेच्या १६ खासदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक आयोजित केली होती. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित १६ खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी याबाबत माहिती दिली.
द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे चर्चेची दारे उघडी राहतील. तसेच एकनाथ शिंदे गट आणि भाजपासोबत जुळवून घेतलं तर ते शिवसेना पक्षाच्या हिताचंच ठरेल असेही शिवसेना खासदारांचे म्हणणे आहे. यापूर्वी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत नेमक्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबत उद्धव ठाकरे एक दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करतील असेही किर्तीकर म्हणाले.
बैठकीत सात खासदार गैरहजर
शिवसेनेचे लोकसभेत १९ आणि राज्यसभेत ३ खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी अयोजित केलेल्या बैठकीत शिवसेनेचे सात खासदार गैरहजर राहिले होते. त्यामुळे आता आमदारांनंतर खासदारही बंड करण्याच्या तयारीत आहेत की काय? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अगोदरही अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेली ही बैठक महत्वपूर्ण मानण्यात येत होती.