ज्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिरकी गोलंदाज तयार झाले त्या देशातील फलंदाजांना फिरकी गोलंदाजी खेळता येऊ नये यापेक्षा मोठा विरोधाभास नाही. परंतु हे निरीक्षण नोंदवले आहे माजी क्रिकेट कसोटीपटू आणि अतिशय अभ्यासू अशा समालोचक व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याने. त्याचे निरीक्षण आणि विश्लेषण क्रिकेट रसिकांना नेहमीच चकित करीत असते. कारण ज्या गोष्टी खेळ पहाण्याच्या नादात रसिकांच्या नजरेतून निसटतात त्या नेमक्या टिपण्याची हातोटी लक्ष्मणकडे आहे. त्याच्या फलंदाजीतील नजाकत मोहून टाकणारी होती. संयत अशा फलंदाजीमुळे चिवटपणा होता आणि त्याची तटबंदी तोडण्यात गोलंदाजांचे घामटे निघत असे. त्याच्या शैलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा बचाव जेवढा तगडा होता तेवढे त्याचे फटके क्षेत्ररक्षकांना भेदत जात असत. असो. त्यांनी नोंदविलेले मत निवड समितीला विचार करायला लावणारे आहे., हे निश्चित.
अर्थात या स्तंभातून क्रिकेटवर भाष्य करण्याचा हेतू नाही. क्रिकेटच्या मैदानात जे होत आहे तेच आपल्या समाजातही घडत आहे काय असा प्रश्न मात्र लक्ष्मणचे विश्लेषण वाचल्यावर मनात आला. फिरकी गोलंदाजीचे संस्कार घेतच आपले क्रिकेटपटू तयार होत गेले. ते बाळकडू होते असे म्हणा हवे तर. त्याची प्रचिती आपण अनेकदा घेतली. त्यावरून टीकाही झाली. परदेशातून संघ येईल तेव्हा आपल्या खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असल्यामुळे पाहुण्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडत असे. नेमकी हीच गत आपले खेळाडू जेव्हा परदेशी जात तेव्हा द्रुतगती गोलंदाजांना सामोरे जाताना अपयशी ठरत असत. आपल्या खेळाडूंची ही मर्यादा लक्षात घेऊन यथावकाश द्रुतगती गोलंदाजीचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आणि उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाऊ लागले. तरीही फिरकी गोलंदाजी खेळणे हा आपला मूळ डीएनए आहे हे नाकारून चालणार नाही. असे असूनही लक्ष्मणला हे निरीक्षण नोंदवावे लागले याचे आश्चर्य वाटते.
क्रिकेटच्या मैदानात जे परिवर्तन घडले आहे ते आपल्या तरुण पिढीच्या बदललेल्या मानसिकतेतही प्रतिबिंबित होते. फिरकी हे जर मूळ संस्कार किंवा आपल्या मूल्य व्यवस्थेचे प्रतीक आहे असे मानले तर हे संस्कार आणि मूल्यव्यवस्था शाबूत राहिली नाही काय हाही प्रश्न यानिमित्ताने डोकावून जातो. वाढत जाणारी आर्थिक आणि सामाजिक विषमता आणि जीवघेणी स्पर्धा यामुळे मूल्य व्यवस्थेचा (फिरकी गोलंदाजीचा) -हास होत असल्याचे वारंवार बोलले जाते. मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण यामुळे तरुण पिढीला एका वेगळ्या पर्यावरणात आपले अस्तित्व टिकवण्याचे आव्हान पेलावे लागत आहे. काही मंडळींना परदेशी जाण्याची संधी मिळत आहे तर काही जणांना कॉर्पोरेट जगतात असलेले परदेशी वातावरण अंगीकारून उत्कर्ष आणि विकास यांची कास धरावी लागत आहे. वेग हा जागतिकीकरणाच्या संरचनेतील अविभाज्य घटक आहे. या वेगाला सामोरे जाणे म्हणजे द्रुतगती गोलंदाजाला सामोरे जाण्यासारखे आहे. सहाजिकच पूर्वीचे संथ गतीचे वळणारे चेंडू अर्थात फिरकी गोलंदाज कालबाह्य होत आहेत. बिन उपयोगचे. T20 असो की आयपीएल, इथे झटपट धावा किंवा व्यापारी भाषेत बोलायचे तर झटपट पैसे कमवणे याकडे फलंदाजांचा भर असतो. त्यामुळे शंभर दीडशे किलोमीटर वेगाने अंगावर येणारे आणि प्रसंगी उसळणारे चेंडू लीलया सीमेपलीकडे तो लावण्याची साहसी वृत्ती क्रिकेटपटूंमध्ये जशी आली तशी आपल्या तरुणाईत आली आहे. या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाज तंत्रशुद्ध आहे किंवा खेळाच्या जुन्या नियमाप्रमाणे (कॉपी बुक स्टाईल) खेळतो काय याला महत्त्व राहिलेले नाही. कॉपी बुक ची जागा पासबुकने घेतली आहे आणि धावफलकावर दिसणाऱ्या त्याच्या कामगिरीवर त्याचे वार्षिक मूल्यमापन (अप्रेसल) ठरत असते. जे फलंदाज वेगवान गोलंदाजांची झोप उडवतात तेथे बिचाऱ्या फिरकी गोलंदाजांची ते पत्रास ठेवणार? थोडक्यात आपले जुने संस्कार आणि मूल्ये यांचा टिकाव लागणार तो कसा ? लक्ष्मणने क्रिकेटमधील हा बदल नोंदवताना नकळत समाजातील बदलावर बोट ठेवले आहे, हे मात्र खरे.