तातडीने तरतूद करण्याची आ. संजय केळकर यांची आयुक्तांना सूचना
ठाणे: घोडबंदर वासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून १० एमएलडी पाण्याची तरतुद करावी, अशी सुचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांना केली आहे.
संबधित सर्व खात्यांची एकत्रित बैठक बोलावून तातडीने निर्णय घेण्याचे निर्देशही आयुक्तांना दिले. यावर आयुक्तांनी देखील सहमती दर्शविली असल्याने लवकरच घोडबंदर परिसर टँकरमुक्त होऊ शकेल, असा आशावाद आ. केळकर यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई लगतच्या ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असून पाण्याची मागणीही वाढत आहे. सर्वाधिक बांधकामे सुरू असलेल्या घोडबंदर परिसराला तर वर्षभर पाणी टंचाईची झळ बसत असते. त्यामुळे एकीकडे पाणी पुरवठा यंत्रणा सक्षम करत असताना घोडबंदर भागात नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये. असे न्यायालयानेही बजावले आहे. तसे प्रतिज्ञापत्र महापालिकेने देऊनही बांधकामे सुरूच आहेत. या पाणी समस्येबाबत अधिवेशनात आवाज उठवला, अनेक आंदोलने केली. तरीही मोठ्या प्रमाणात इमारतींची कामे सुरू आहेत. मग या नवीन रहिवाशांना पुरेसे पाणी मिळणार कसे? नवीन बांधकामे रोखली, तरच पाणी टंचाईची झळ कमी होईल, याकडे आ. केळकर यांनी लक्ष वेधले.
घोडबंदर रोडवर पाण्यासाठी आक्रोश होत आहे. येणारा उन्हाळा तसेच पुढील काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. त्यामुळे आजघडीला घोडबंदर परिसराला १० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रशासनाने १० एमएलडी पाण्याची तरतुद करावी. त्याकरीता ठाणे महापालिकेने संबधित सर्व खात्यांच्या अधिकाऱ्याची बैठक बोलावुन तातडीने निर्णय घ्यावा. तरच घोडबंदर परिसर टँकरमुक्त होऊ शकेल. घोडबंदर परिसराला वाढीव पाणी देण्याबाबत महापालिका आयुक्त देखील सहमत आहेत. तेव्हा, आयुक्तांच्या माध्यमातुन शासनाकडे देखील घोडबंदर परिसरासाठी १० एमएलडी पाण्याची तरतुद करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. संजय केळकर यांनी सांगितले.