उद्यानांमध्ये महिलांसाठी सुसज्ज हिरकणी कक्ष

आमदार प्रताप सरनाईक यांची अभिनव संकल्पना

ठाणे: ओवळा-माजिवडा मतदारसंघामध्ये सर्व मैदाने उद्याने आणि जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या अभिनव संकल्पनेतून माता-भगिनींची सोय व्हावी यासाठी सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ तयार करण्यार येणार आहेत. राज्य यासाठी राज्य सरकारकडून सुमारे २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ओवळा-माजिवडे मतदारसंघात स्त्री व शिशूंसाठी पुरेसे स्वतंत्र स्तनपान कक्ष नसल्याने मोठी हेळसांड होत आहे तसेच स्त्रियांसाठी स्वच्छतागृहांची कमतरताही भासत आहे. म्हणून या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्याकरिता आमदार सरनाईक यांच्या संकल्पनेतून ओवळा-माजिवडा मतदारसंघात विविध ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी होणार आहे. या हिरकणी कक्षात वातानुकूलित स्वच्छतागृह, स्तनपान कक्ष, सॅनिटरी पॅड्स व सेंनिटायझर वितरक यंत्र, स्वयंचलित फ्लशिंग यंत्र इत्यादी सोयी-सुविधा यात समाविष्ट असणार आहे.

मतदारसंघातील ठाणे महापालिका क्षेत्रात उद्याने, मैदानामध्ये यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ठेकेदाराच्या माध्यमातून त्याची निगा व देखभाल देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात कामाला सुरुवात होईल आणि पुढील ६ ते ८ महिन्यात हे हिरकणी कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

रामदास राव उद्यान-वर्तकनगर, सिध्दिविनायक उद्यान-शास्त्रीनगर (लक्ष्मीपार्क), महिला बचत गट उद्यान-पाडा नं. १, श्रीनिवास खळे उद्यान-कोकणीपाडा, कै. इंदिरा बाबूराव सरनाईक निसर्ग उद्यान-पोखरण रोड नं. २, नामदेव ढसाळ उद्यान-सुरेंद्र इंडस्ट्रीज रस्ता, सिध्दांचल फेज ४ जवळील उद्यान, सिध्दांचल इलाईट सोसायटी जवळील उद्यान, स्वामी विवेकानंद नगर (जुना म्हाडा) येथील आरक्षित उद्यान, श्रीपत कृष्णा पाटील उद्यान-तुळशीधाम, प्रमोद महाजन निसर्ग उद्यान-निळकंठ वुडस, बायोडायवर्सिटी कासारवडवली उद्यान, मोघरपाडा उद्यान, कासारवडवली उद्यान, ट्रॅफिक पार्क, स्व. वसंत डावखरे उद्यान-कासारवडवली येथे हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने ठाणे महापालिकेसाठी या योजनेकरिता २० कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून पुढील महिन्यात कामाला सुरुवात होणार असल्यामुळे श्री. सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि आयुक्तांचे आभार मानले.