ठाण्यातही होर्डिंगने घेतला प्रवाशाचा जीव

ठाणे,दि.8(वार्ताहर)-खोपट एसटी स्टँड येथील टीएमटीच्या बस स्टॉपवर बसलेल्या एका व्यक्तिला जाहिरात फलकाच्या वीजतारेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. टीएमटीच्या आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दोस्त महमंद सलमानी (40) असे शॉक लागून मरण पावलेल्या व्यक्तिचे नाव असून भांडुप येथे राहणारा होता. तो आंबेडकर रोड परिसरातील एका केश कर्तनालयात काम करतो. आज दुपारी खोपट येथील एसटी वर्कशॉप समोरील टीएमटीच्या बस थांब्यावर बसला असताना बस स्टॉपवरील जाहिरात फलकाला वीजपुरवठा करणारा विद्युत प्रवाह बस स्टॉपमध्ये उतरला. त्याच्या संपर्कात श्री.डोसा आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची चर्चा आहे. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्यानंतर या पथकाने वीजप्रवाह बंद केला. जाहिरात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. परिवहन प्रशासनाने जाहिरातदार ठेकेदाराच्या विरोधात कारवाई करावी आणि मृत पावलेल्या डोसा यांच्या परिवाराला मदत करावी अशी मागणी आंबेडकर रोड येथील नागरिकांनी केली आहे.