मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसातही ४७ टक्के मतदान!

भाईंदर,दि.२०(वार्ताहर)-मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले. गेल्यावर्षीपेक्षा यंदा दोन ते तीन टक्क्याने मतदान वाढू शकते. विशेष म्हणजे जोरदार पाऊस असतानाही मतदारांचा उत्साह कमी झाला नव्हता. या निवडणुकीत ५०९ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाचा टक्का अंदाजे ४७ पर्यंत स्थिरावला. मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाला वेधशाळेकडून शनिवार व रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने चिंता लागली होती. पावसाचा अंदाज हेरुन प्रशासनाने प्रत्येक मतदार केंद्रात मंडप घातले. यामुळे मतदारांना दिलासा मिळाला. मतदान करण्यासाठी येणार्‍या वृद्ध व अपंगांसाठी प्रशासनाने प्रथमच डोली (पालखीची) सोय उपलब्ध करुन दिल्याने त्या मतदारांची चांगली सोय झाली. परंतु, यंदाच्या निवडणुकीत चार जणांच्या पॅनलनुसार केलेल्या प्रभाग रचनांमुळे नेमके मतदान केंद्र शोधताना अडचण निर्माण होत होती. दरम्यान मीरारोड येथील आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन ईलेव्हन शाळेतील मतदान केंद्रात एका अधिकृत मतदाराच्या नावावर तोतया मतदाराने मतदान केले. यामुळे या केंद्रावर बोगस मतदान झाल्याची चर्चा सुरु झाली होती. तत्पुर्वी कॉंग्रेसचे प्रभारी राजेश शर्मा यांनी याच केंद्रावर बोगस मतदान होणार असल्याची शक्यता वर्तविली होती. ती खरी ठरल्याचा दावा कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडुन करण्यात आला. तसेच भाईंदर पश्चिमेकडील सेकंडरी शाळेतील मतदान केंद्रात आ. नरेंद्र मेहता यांनी आगमन करताच तेथे उपस्थित असलेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यामुळे सेना-भाजपा कार्यकर्त्यांत बाचाबाची झाल्याने पोलिसांना त्यांना पांगविण्यासाठी लाठ्या उगाराव्या लागल्या. यंदाची निवडणुक थेट सेना- भाजपात होत असल्याने सेनेचे आ. प्रताप सरनाईक व आ. मेहता मतदानाचा आढावा घेण्यासाठी शहरभर फिरताना दिसत होते. मतदानाला सुरुवात होताच शहरातील नेत्यांनी आपापल्या मतदान केंद्रांत मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या पूर्वसंध्येला एका महिलेकडे ४० लाखांची रोकड सापडल्यासह प्रभाग २ मधील भाजपाच्या उमेदवार शानू गोहिल यांनी प्रभागात पैसे वाटल्याच्या तसेच भाईंदर पश्चिमेकडील बालाजीनगरमध्ये कल्याणचे भाजपा आ. नरेंद्र पवार फिरत असल्याच्या अफवेचे शहरात पीक आले होते. एकुण १७ तृतीयपंथी मतदारांपैकी केवळ प्रभाग १७ मधील एकाच तृतीपयंथीयाने मतदानाचा हक्क बजावला. मतदानादरम्यान थेट केंद्रात तसेच १०० मीटर प्रतिबंधित परिघात उमेदवारांचा सर्रास वावर होता. त्यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर काढण्यासाठी निवडणूक व पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.