भिवंडीत ११ पैकी आठ ग्रामपंचायती भाजपाकडे

भिवंडी,दि.२७(वार्ताहर)-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील काही भागात भाजपची पिछेहाट झाली असतानाच, भाजपने तालुक्यात पुन्हा मुसंडी मारली आहे. तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप-श्रमजीवी संघटनेच्या युतीने आठ ठिकाणी दणदणीत विजय मिळविला. तर शिवसेनेला अवघ्या दोन ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. राहनाळ, कालवार, काटई आदी प्रतिष्ठीत ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या धामधुमीतच तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका होत होत्या. या ठिकाणी भाजपने नियोजनबद्ध प्रचार सुरू केला होता. भाजपचे ठाणे विभागीय अध्यक्ष व खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, तालुकाध्यक्ष पी.के.म्हात्रे यांनी प्रचाराचे नियोजन केले होते. त्यात आठ गावांमधील ग्रामपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर मात करीत भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला. राहनाळमध्ये राजेंद्र मढवी, काटईत नीता सुशील जाधव, कालवारमध्ये देवानंद रामकृष्ण पाटील, वडूनवघरमध्ये सोनम यतीश चौघुले, वज्रेेशरीत सुनिता भवर, कुसापूरमध्ये शुभांगी पांडुरंग शेलार, चिंचवलीत शांती बुध्या शेलार यांची सरपंचपदी निवड झाली. तर महाळुंगे येथे भाजप-श्रमजीवी संघटनेच्या जागृती जयवंत भावर यांनी विजय मिळविला. या यशाबद्दल खासदार कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.