वाड्यात डेंग्यूचा पहिला बळी

वाडा,दि.११(वार्ताहर)-मुंबई, ठाणे सारख्या शहरी भागात डेंग्यू आणि स्वाईन फ्लू सारख्या साथीच्या आजाराने दहशत माजवली असतांनाच वाड्यासारख्या ग्रामीण भागातही निखिल पटेल (२६) या तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण वाडा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाडा व परिसरात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करून नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने फवारणी करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. निखिलला गेल्या आठ नऊ दिवसापासून ताप येत होता. रक्त तपासणी नंतर त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.त्याला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी त्याला वापी येथील रुग्णालयात नेत असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याबाबत वाडा तालुका आरोग्य अधिकारी डी. डी. सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता निखिल पटेल याने कुठल्याही शासकीय रुग्णालयात उपचार घेतले नव्हते तरी आम्हाला माहिती मिळताच त्यांची आम्ही भेट घेऊन ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार घेण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यांच्या घराच्या परिसराचे व आजूबाजूच्या भागाचे सर्वेक्षण केले असता डेंग्यूच्या आळ्या अथवा तशी परिस्थिती आढळून आली नसून संपूर्ण तालुक्यात डेंग्यूची साथ नसल्याचे सोनावणे यांनी स्पष्ट केले.