प्रशासनावर उरला नाही सत्ताधार्‍यांचा वचक!

कल्याण,दि.२६(वार्ताहर)-आंबिवली गावठाण या परिसरात मोठ्या प्रमाणात चाळ माफिया बिनदिक्कत चाळीचे बांधकाम करीत आहेत. याची पालिकेकडे वेळोवेळी तक्रार करूनसुद्धा याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. याच्याविरोधात शिवसेना नगरसेवक गोरख जाधव आणि माजी नगरसेवक दशरथ तरे यांनी कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. या नगरसेवकाचे म्हणणे आहे कि १०० तक्रारी करूनसुद्धा महापालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. या अनधिकृत बांधकामामुळे नळजोडण्यादेखील अनधिकृत होत असल्याने रहिवाशांना याचा फटका बसत आहे. आणि याठिकाणी अस्वच्छता पसरत आहे. कल्याण-डोंबिवली माहापालीकेत शिवसेना २० वर्षांपासून सत्तेत आहे तरी देखील त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांला उपोषणाचे अस्त्र उचलावे लागत असल्याने इतरांचे कसे होणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. कल्याणनजीक असलेल्या आंबिवली, अटाळीमध्ये सार्वजनिक हिताकरिता आरक्षित असलेल्या भूखंडावर चाळ माफियांनी अतिक्रमण करत अनधिकृत बांधकामे केली आहेत. तसेच प्रभागात पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला होल मारत अनधिकृतपणे नळजोडण्याही देण्यात आल्या आहेत. अप्रशिक्षित प्लंबर जलवाहिन्यांना जोडण्या देत असल्याने या होलमधून दूषित पाणी जलवाहिनीमध्ये गेल्याने पाणीही दूषित होत आहे. करदात्या नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. अनधिकृत नळजोडण्यांमुळे शासकीय महसूल बुडत आहे. या प्रभागात सफाई कर्मचार्‍यांची संख्यां अपुरी असल्याने गटारसफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरत असून नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या प्रभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई, अनधिकृत बांधकम करणार्‍यांवर एमआरटीपी अंतर्गत कारवाई, अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई, सफाई कर्मचार्‍यामध्ये वाढ या मागण्यांसाठी शिवसेना नगरसेवक गोरख जाधव यांनी सातत्याने तक्रारी करत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत कारवाईची मागणी केली होती. मात्र पालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप नगरसेवक जाधव यांनी केला आहे. अखेर प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आपल्या मागण्यांसाठी श्री.जाधव यांनी शिवसेना पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांसमवेत पालिका मुख्यलयानजीक छत्रपती शिवाजी चौकात बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. तसेच जोवर पालिका आपल्या मागण्या पूर्ण करणार नाही तोवर उपोषण सुरूच राहणार असे श्री.जाधव यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवसेनेची सत्ता असूनही सत्ताधार्‍यांच्या तक्रारींवर पालिका कारवाई करीत नाही. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकावर उपोषणाची नामुष्की ओढवल्याने सत्ताधार्‍यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याची चर्चा या निमित्ताने शहरात रंगली आहे.