उल्हासनगरच्या कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास होणार

उल्हासनगर,दि.११(वार्ताहर)-उल्हासनगर येथील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाची इमारत धोकादायक बनली असून या संपूर्ण संकुलाचा तातडीने पुनर्विकास व्हावा, यासाठी कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्य सरकारकडून सविस्तर प्रस्ताव येताच पुनर्विकासाला तातडीने मंजुरी देण्यात येईल आणि निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही कामगार राज्य विमा योजनेचे महासंचालक श्री.राजकुमार यांनी शुक्रवारी खा.डॉ.शिंदे यांना दिली. या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मुद्दा खा.डॉ.शिंदे यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेतही उपस्थित केला होता. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसह १२ निवासी इमारतींचाही पुनर्विकास करण्याची गरज असून या रुग्णालयाचे रुपांतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात करण्याची मागणीही खा. डॉ. शिंदे यांनी केली. उल्हासनगर येथील कामगार राज्य विमा योजनेच्या रुग्णालय संकुलात मुख्य रुग्णालयासह एकूण १३ इमारती आहेत. आयआयटी, मुंबईने मे महिन्यात या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मुख्य इमारतीसह एकूण ११ इमारती धोकादायक घोषित करून संपूर्ण पाडण्याची शिफारस केली आहे. उर्वरित दोन इमारतींचीही मोठ्या प्रमाणात दुरुस्ती सुचवण्यात आली. खा. शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करून या सर्व इमारतींच्या जागी नव्या इमारती बांधण्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली. उल्हासनगर आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे रुग्णालय आहे. मात्र, त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रुग्णालयाची मंजूर कर्मचारी संख्या २४८ असली तरी भरती केवळ १३१ जणांची करण्यात आली आहे. रुग्णालयातील अनेक उपकरणे ४० वर्षे जुनी आहेत. पोर्टेबल एक्स रे मशीन, पल्स ऑग्झिमिटर, बेडसाइड मॉनिटर, फ्युमिगेशन मशिन यांसारखी साधी उपकरणेही या रुग्णालयात उपलब्ध नाहीत. या रुग्णालयात शस्त्रक्रिया होत नाहीत. साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नाही, असा अडचणींचा पाढाच खा.डॉ.शिंदे यांनी वाचला.हे रुग्णालय तात्पुरत्या स्वरुपात जवळपासच्याच परिसरात स्थलांतरित करण्याची मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात खा.डॉ.शिंदे यांनी शुक्रवारी कामगार राज्य विमा योजनेचे (एसिक) महासंचालक श्री.राजकुमार यांची भेट घेतली. त्यावेळी एसिकचे समिती सदस्य चंद्रकांत खैरे हे ही उपस्थित होते. रुग्णालयाची परिस्थिती श्री.राजकुमार यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी राज्य सरकारने सविस्तर प्रस्ताव पाठवल्यावर तातडीने पुनर्विकासाला मंजुरी देण्याची ग्वाही दिली. कामगार आणि रोजगार खात्याच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ.किरीट सोमय्या यांच्याशीही याबाबतीत चर्चा झाली असून याबाबतच्या प्रस्तावाला समितीच्या पुढील बैठकीत मंजुरी देण्याची ग्वाही दिल्याची माहितीही खा.डॉ.शिंदे यांनी दिली.