विजेची तार अंगावर पडून शेतकर्‍याचा मृत्यू

वाडा दि. ४(वार्ताहर)- तालुक्यातील सापने या गावात अंगावर विजेची तार पडून झिपर केशव धनगर (५५) या शेतकर्‍याचा व बैलाचा शेतामध्ये नांगरणीचे काम करीत असताना जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाडा तालुक्यातील सापणे गावातील सकाळी ११ वाजता आपल्या शेतामध्ये नांगरणी करते वेळी विद्युत पोलावरची तार अंगावर कोसळून सदर शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याने विज वितरण कंपनीच्या अशा गलथान कारभाराविरुद्ध शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे गटनेते निलेश गंधे उपतालुका प्रमुख उमेश पटारे व तुषार यादव यांनी घटनास्थळी भेट देवून विज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी या शेतकर्‍याच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करण्यासंबंधी सांगितले. त्याप्रमाणे एक लाख रुपये तातडीची मदत म्हणून दुर्दैवी झिपर धनगर याच्या कुटुंबियांना देण्यात आली. दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीचे उप अभियंता लक्ष्मण राठोड यांची बोईसर येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी नवीन अधिकारी हजर न झाल्यामुळे तालुक्यातील एकूणच वीज वितरणला कोणी वालीच नाही. वास्तविक पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कंपन्या, छोटेमोठे उद्योग असल्याने विद्युत पुरवठा आणि त्यांची सुरक्षितता ही अत्यावश्यक आहे परंतु अधिकारी नसल्याने नियोजनाचा अभाव असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. जुन्या विजेच्या तारा अथवा ज्यामुळे असे अपघात घडतात त्या दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी सरपंच सुनील धानवा यांनी केली आहे.