दोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत

शहापुर,दि.६(वार्ताहर)-प्रशासन अधिकाधिक गतिमान व लोकाभिमुख विशेषतः पारदर्शी होण्याच्या उदात्त हेतुने मोबाईल अथवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी यासाठी आपले सरकार-तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आली, परंतु या पोर्टलवर तक्रारदाराला उत्तर देणारे अधिकारीच या स्तुत्य उपक्रमाला हरताळ फासुन निष्कलंक मुख्यमंत्र्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करू पाहत असल्याचा अनुभव शहापुरातील जनतेला आला आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत शहापुर तालुक्यात डांबरी रस्त्यांची कामे झाली, मात्र अल्पावधीत म्हणजे तीन महिन्यांच्या आतच रस्त्यांची चाळण होऊन रस्त्यांवर दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनचालकांचे असंख्य जीवघेणे अपघात झाले. शहापुरातील रस्त्यांवर शासनाच्या लाखो रूपयांची माती झाली असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गडगे यांनी मुख्यमंत्री पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करुन सदर निकृष्ट कामांची चौकशी करुन दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तक्रार दाखल केली होती, मात्र या तक्रारीला उत्तर देतांना मुख्यमंत्री पोर्टलवरुन असे सांगण्यात आले की, तालुक्यात नव्याने झालेले रस्ते पहिल्या पावसात वाहून गेले ही बाब खरी नाही. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली अशी वस्तुस्थिती नाही मात्र अतिवृष्टीमुळे अल्प प्रमाणात पृष्ठभाग दबणे किंवा खड्डे पडणे अशा स्वरुपात रस्त्याचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. खड्यांचे प्रमाण अल्प म्हणजे ०.५० टक्के पेक्षा कमी आहे त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असे म्हणणे योग्य ठरणार नाही असे संशोधन या महाशयांनी केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेले टेंभरे फाटा ते टेंभरेगाव व शिरगाव ते नडगांव हे रस्ते उखडले नसून त्यांचा पृष्ठभाग दबला आहे व त्यावर अल्प खड्डे पडले असुन रस्त्याची नगण्य हानी झाल्याचे म्हटले आहे. विशेषतः तालुक्यातील ठेकेदार वा मजूर कामगार संस्थांनी शासकीय अधिकार्‍यांशी संगनमत करुन निकृष्ट दर्जाची कामे केली व त्यामुळे शासनाचा करोडो रूपयांचा निधी वाया गेला असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही असे नमुद करुन तक्रारदाराला वेड्यात काढण्याचा प्रकार केला आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता व वस्तुस्थिती न पाहता मुख्यमंत्री पोर्टलवरुन अशी ऑनलाईन माहिती देणार्‍या अधिकार्‍याचा सन्मान करावा अशी खोचक प्रतिक्रिया देत या बेजबाबदार उत्तराने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.