साकेत पुलाला भेगा; वाहतूक मंदावली

ठाणे, दि.10(वार्ताहर)-संततधार पडणार्‍या पावसामुळे मुंबई, नाशिक महामार्गावरील साकेत पुलाला भेगा पडल्या. या मार्गावरील अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून वाहनांची गती मंदावली आहे. नाशिककडे जाणार्‍या वाहिनीवर या भेगा पडल्याचे सकाळी 10 च्या सुमारास वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले त्यानंतर पोलिसांनी रस्त्याला भेगा पडलेल्या ठिकाणी बॅरिकेटस लावून तेथील वाहतूक थांबवली होती. तसेच या पुलावरून जाणारी अवजड वाहनांची वाहतूक कशेळी, काल्हेर, भिवंडी मार्गे वळवण्यात आली होती. ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक सुहास देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाला या भेगांबाबत माहिती दिली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार दुपारी 1 च्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री.महाजन यांच्या पथकाने साकेत पुलाला भेट देऊन त्याची पाहणी केली. भेगा पडलेल्या ठिकाणी लोखंडी पट्टी टाकण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी केवळ हलकी वाहने या मार्गाने सोडली. केवळ चार ते पाच तासात येथे स्टील प्लेटींग करून तडा बंद केला आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली. रस्त्याला कोणताही धोका नसल्याचे श्री.महाजन यांनी स्पष्ट केले आहे.