‘रोटरी’ला विकास कार्यक्रमात सामील करून घेणार-जयस्वाल

ठाणे,दि.8(प्रतिनिधी)-देशात सामाजिक-आर्थिक-राजकीय संक्रमण सुरू असताना परिवर्तनाच्या प्रक्रियेत सामाजिक संस्थांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे असे मत ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केले. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3142 तर्फे आयोजित ‘पब्लिक इमेज’ सेमिनारमध्ये श्री.जयस्वाल आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी विचार मांडले. ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांनी त्यांच्याशी बातचीत केली. रोटरीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने कल्पकता दाखवून सरकारी वा राजकीय पक्ष राबवत असलेलया उपक्रमांपेक्षा वेगळे कार्य करून दाखवायला हवे, असे सांगून श्री. कुबेर यांनी सामाजिक संस्थांचा सुळसुळाट काही वेळा उपयुक्ततेपेक्षा उपद्रव वाढवतो,असेही सांगितले. समाजाची नेमकी गरज काय याचा अभ्यास करून संस्थांनी उपक्रमांची निवड केली तर त्यांच्या विश्‍वासार्हतेचे आणि उपयुक्ततेचे समाजही कौतुक करेल, असे ते म्हणाले. ‘स्मार्ट सिटी’ सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांत समाजाचा सहभाग निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी समाजाची मानसिकता अनुकूल करण्याचे काम जनजागृतीच्या माध्यमाद्वारे संस्था करू शकतील. सरकारी संस्थांना पूरक कार्य या संथांनी करावे, असे ते म्हणाले. रोटरीसारख्या 113 वर्षे जुन्या संस्थेच्या कार्याची दखल घेतली जात नाही. या तक्रारीला उत्तर देताना श्री. कुबेर म्हणाले की, त्यात नेमके माध्यमांवर खापर फोडता येणार नाही. उपक्रमाची परिणामकारकता आणि त्याबद्दलची माहिती वर्तमानपत्रांत आवश्यक त्या स्वरुपात पाठवली तर ही अडचण दूर होऊ शकेल. रोटरीची प्रतिमा गैरसमज पसरवत असेल तर संस्थेतील धुरिणांनी त्याबाबत सदस्यांना मार्गदर्शन करायला हवे, असेही श्री. कुबेर म्हणाले. रोटरीसारख्या संस्थांची शहरातील विकास प्रक्रियेत आवश्यकता आहे असे सांगून श्री. जयस्वाल यांनी रोटरीच्या मदतीने ‘अ‍ॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट’(एएलएम) अर्थात प्रगत स्थानिक नियोजन उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्याबाबतची पहिली बैठक 20 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक संस्थांशी सरकारी संस्थांना संवाद साधायला आवडतो, परंतु अनुभव असा आहे की अशा संवादात व्यक्तिगत गार्‍हाणीच मांडली जातात. आमच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढत आहेत आण्ि अशावेळी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन आमच्या कामात सहभाग घेतल्यास, प्रश्‍न जलदगतीने सुटू शकतील. सकारात्मक दबाव गटाचे आम्ही स्वागतच करू, असे श्री. जयस्वाल म्हणाले. रोटरीचे दिल्लीतील माजी प्रांतपाल विनोद बन्सल आणि 3142 चे प्रांतपाल डॉ. आशिष गांगुली यांनी माध्यमांना रोटरीच्या कामाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. माजी प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी प्रसिध्दीच्या बाबतीत सर्वांनीच अंतर्मुख होण्याचे आवाहन केले आहे. राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीला रोटरीसारखी संस्था सामाजिक इच्छाशक्ती निर्माण करण्यात असंख्य उपक्रम करून पुढे राहिली आहे, असे श्री.बल्लाळ म्हणाले.