राजीव गांधी उड्डाणपुलावर जीवघेणे खड्डे, अपघाताची टांगती तलवार डोक्यावर

भिवंडी,दि.१९(वार्ताहर)-भिवंडी महापालिकेच्या विद्यमाने कृष्णा कॉम्पलेक्स ते बागेफिरदोस मशीदपर्यंत उड्डाणपुल बांधण्यात आलेला आहे. या उड्डाणपुलावर एस.टी.स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील मार्गावर मोठे खड्डे पडल्याने वाहन चालक त्रस्त झालेले आहेत. या प्रकरणी महापालिका बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे दिवसेंदिवस खड्ड्यांची व्याप्ती वाढत चाललेली आहे. खड्यांमधून लोखंडी सळया डोकेवर काढत असून कोणत्याही वेळेस दुचाकी, रिक्षा किंवा छोट्या गाड्यांना अपघात होऊ शकतो. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी स्वत: राजीव गांधी उड्डाणपुलाला भेट देऊन खड्यांची पाहणी करावी आणि तात्काळ खड्डे बुजविण्याची कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, शिवाय ज्या ठेकेदाराने या उड्डाणपुलाचे बांधकाम केलेले आहे ते निकृष्ट दर्जाचे केल्याने रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. यामुळे ठेकेदारावर महापालिकेने कायदेशीर कारवाई करावी आणि उड्डाणपुलाच्या रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवले जावेत अशी वाहन चालकांची मागणी आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे या खड्ड्यांची तीव्रता अधिक जाणवत आहे.