मांगरूळच्या डोंगरमाथ्यावर महावृक्षारोपणाचा यज्ञ

डोंबिवली,दि.५(वार्ताहर)-खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मांगरुळ परिसरातील डोंगरमाथ्यावर १५ हजार स्वयंसेवक, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, महिला आणि नागरिकांनीं महावृक्षारोपण यज्ञात वृक्षारोपणाची समिधा वाहून एक लाखांपेक्षा अधिक वृक्ष लावून झाडे लावण्याचे महाअभियान यशस्वी केले. अतिशय जल्लोषात आणि शिस्तबध्द रितीने पार पडलेल्या या वृक्षारोपण अभियानात १५ हजारहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. केवळ वृक्षारोपण करून थांबणार नसून ही झाडे जगवून येत्या पाच वर्षांत या परिसराचे रुपांतर मानवनिर्मित देखण्या वनराईत करण्याची ग्वाही देखील खा.डॉ.शिंदे यांनी यावेळी दिली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या विधायक उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या पोर्शभूमीवर मांगरूळ येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या पर्यावरणाच्या वारकर्‍यांमुळे या संपूर्ण परिसराला वारकरी दिंडीचे स्वरूप लाभले होते. यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे म्हणाले, एक लाख वृक्ष प्रत्यक्ष लावायचे म्हटले की त्या प्रकारची जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. पण कलेक्टर डॉ.कल्याणकर यांनी हे पठार देऊन जागेचा प्रश्न निकाली निघाला. ही सर्व झाडे जगवून एक मोठे जंगल होईल आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नातील खरोखर निसर्ग उद्यान पहावयास मिळेल. पर्यावरणाचे संवर्धन हे केवळ शासनाचे काम नसून प्रत्येक व्यक्तीने त्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे, या हेतूने खा.डॉ.शिंदे यांनी लोकसहभागातून मांगरूळ येथे १ लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. उपमुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी मांगरूळ येथे ८५ एकर जागा उपलब्ध करून दिली. खासदार डॉ.शिंदे यांनी विविध संस्थासं घटना, शाळा, महाविद्यालये यांना आवाहन केले. विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह सातत्याने बैठका घेतल्या. परिणामी, १५ हजारहून अधिक जणांनी या अभियानात सहभाग घेतला. ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालय आणि आनंद विेश गुरुकुल महाविद्यालयाच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले. महाराष्ट्र नेचर पार्कचे उपसंचालक अविनाश कुबल यांचे विशेष सहकार्य या अभियानाला लाभले. गेल्या महिन्याभरापासूनच या ठिकाणी या महाअभियानाची नियोजनबद्ध तयारी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती. या महाअभियानाचे उत्कृष्ट नियोजन हा सर्व उपस्थित मान्यवरांच्या कौतुकाचा विषय होता. कार्यक्रम पार पडल्यानंतर पडलेले प्लास्टिकचे रॅपर, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि अन्य कचरा एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थी, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी साफ करून परिसर स्वच्छ केला. याप्रसंगी आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, महापौर राजेंद्र देवळेकर, मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपमुख्य वन संरक्षक जीतेंद्र रामगावकर, मांगरुळच्या सरपंच नंदिता पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनेते संतोष जुवेकर, मंगेश देसाई, उदय सबनीस, दिग्दर्शक विजू माने आदींची विशेष उपस्थिती होती.