मुंब्रा बायपासला भेगा, रस्त्याकडील घरांना धोका

ठाणे,दि.11(वार्ताहर)-संततधार पावसामुळे मुंब्रा बायपास महामार्गावरील रस्त्याला भली मोठी भेग पडली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार नसला तरी या रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना मात्र धोका निर्माण झाला आहे. मुंब्रा बायपास महामार्गाच्या दुरूस्तीचे काम गेले दोन महिने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील अलमास कॉलनीच्या जवळ असलेल्या रस्त्यावर सुमारे दीड ते दोन फूट रुंद अणि 18 ते 20 फूट लांबीची मोठी भेग पडली आहे. त्यामुळे या रस्त्याचे दोन तुकडे झाल्यासारखे दिसत आहे. हा रस्ता डोंगरातून जात आहे. त्याच्या पायथ्याशी नागरी वस्ती आहे. मुंब्रा बायपास मार्गावर अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. हा रस्ता खचल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या रस्त्याला भेग पडल्याची माहिती मिळताच मुंब्रा, प्रभाग समितीच्या अध्यक्षा अनिता किणे, नगरसेवक शानू पठाण, नगरसेविका अशरीन राऊत, नगरसेविका फरजाना शाकिर शेख आणि साकिब दाते यांनी या मार्गाची पाहणी करून लवकरात लवकर त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. दरम्यान आज दिवसभरात पावसाने थांबून थांबून हजेरी लावली. आज साडेनऊ तासात अवघ्या 7.36 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत शहरात 2158.18 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागीलवर्षी 1087 मिमी पाऊस पडला होता. शहरात अतिवृष्टी होण्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला होता. परंतु तो इशारा रात्री मागे घेण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केले.