शिवसेना आणि भाजपातील तूतू-मैमैचा फायदा कॉंग्रेसला

भाईंदर,दि.१८(वार्ताहर)-मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचे सूप वाजताच खर्‍या अर्थाने पक्षांतराला सुरुवात होणार असून त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही संघटना तर मोठ्या राजकीय पक्षात विलीन होण्याची दाट शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे. यात प्रामुख्याने एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या सेना-भाजपातील तूतू-मैमैचा फायदा मात्र कॉंग्रेसला होणार आहे. यंदाची निवडणूक प्रामुख्याने सेना-भाजपात होणार असली तरी कॉंग्रेसने पक्षातील गळती सावरुन स्वत:चे अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसने पक्षाची मोट मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीला खिंडार पाडून त्यातील काही दिग्गजांना आपल्या हाताखाली घेतले. त्यामुळे राष्ट्रलवादीच्या अस्तित्वाची घडी (घड्याळ) सतत सुरु ठेवण्यासाठी पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पक्ष अस्तित्वाच्या लढाईत कॉंग्रेसला आघाडीसाठी गळ घालण्यास सुरुवात केली आहे. परंतु, त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यास कॉंग्रेस अनुत्सुक आहे. त्यामुळे राष्ट्रलवादीला स्वबळावर(?) निवडणुकीच्या आखाड्यात उतरावे लागणार आहे. या आघाडी-बिघाडीच्या फे र्‍यात अडकलेल्या कॉंग्रेसला गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मैत्रीला छेद देणार्‍या सेना- भाजपातील वादाचा चांगलाच फायदा होणार आहे. ज्या प्रभागात कॉंग्रेसला पोषक वातावरण आहे. त्या ठिकाणी सेना-भाजपा उमेदवारीमुळे अडचण निर्माण होणार आहे. परंतु, तेथील सेना-भाजपातील प्रत्यक्षात मतविभागणीचा फायदा कॉंग्रेसकडून नक्कीच उठविला जाण्याचे संकेत मिळत आहेत. या मतविभागणीच्या खेळात भाजपाने सेनेलाच काटशह देण्यासाठी काही संघटना आणि परिषदांचा सहारा घेतला आहे. मात्र ती खेळी कितपत यशस्वी ठरणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या कमळात एकहाती सत्तेचा स्वानंद उधळत असला तरी सेनेतील प्रवेशासाठी वाढलेल्या रांगा भाजपाच्या स्वानंदावर विरजन टाकणार्‍या ठरु लागल्या आहेत. त्यामुळे पक्षाने भाजपाचे कमळ कोमेजू नये, यासाठी थेट खा. कपिल पाटील यांची निरीक्षक पदावर नियुक्ती केली आहे. सोबतीला राज्यमंत्री रविंद्र चव्हाणांचे मार्गदर्शन देण्यात आले आहे. बिथरलेल्या स्थानिक नेतृत्वाला आधार देण्यासह एकहाती सत्तेसाठी वरिष्ठांनी दिग्गजांची फौज दिमतीला दिल्याने प्रचाराचा डाव आखण्यासाठी रोज जोरबैठका पार पडत आहेत. निवडणुकीच्याच हंगामात भाजपाच्या कमळात अद्यापही विसावलेले ज्येष्ठ पक्षात सुरु झालेल्या एकाधिकार शाहीला कंटाळले आहेत.