कोंडीची संक्रांत संपणार!

ठाणे,दि.११(वार्ताहर)-ठाणे-मुलुंड दरम्यान कोपरी येथील अरुंद ब्रिजमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या हजारो वाहनचालकांना लवकरच दिलासा मिळणार असून महिनाअखेरीस या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात एमएमआरडीए अधिकार्‍यांसमवेत गुरुवारी झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. तसेच, ठाणे मेट्रोची निविदा प्रक्रियाही महिन्याभरात पूर्ण होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. कोपरी पुल अरुंद असल्यामुळे येथे गेली काही वर्षे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. पूर्व द्रुतगती मार्ग आठ पदरी असला तरी कोपरी पुल चार पदरी असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. परिणामी सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या येथे वाहतूक कोंडीचा फटका हजारो वाहनांना बसतो. मध्य रेल्वेच्या समन्वयाने या ठिकाणी नवा आठ पदरी पुल बांधण्यात येणार असल्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमस्वरुपी दिलासा मिळणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होऊन महिना अखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी सांगितले. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, प्रभारी सहायक संचालक, नगररचना प्रमोद निंबाळकर, कार्यकारी अभियंते श्री.पाफळकर आदी उपस्थित होते.