काकोळे ग्रामस्थांचा हंडा आणि कावड मोर्चा

अंबरनाथ,दि.१५(वार्ताहर)-धरण उशाला पण कोरड घशाला अशी विचित्र अवस्था असलेल्या काकोळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आल्याने आज महिलांनी हंडा तर पुरुषांनी कावड घेऊन अंबरनाथ पंचायत समिती कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले. अंबरनाथ शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर रेल्वेच्या मालकीचे जीआयपी धरण आहे. त्यापाण्यापासून रेल्वेचा जलप्रकल्प आहे. मात्र याच ठिकाणी असलेल्या काकोळे गावात नळ पाणीपुरवठा योजना असूनही ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण होते. नळाच्या पाण्याला दाब कमी असल्याने पाण्याचा हंडा भरायला तासनतास थांबावे लागते. पाण्याचे कायम दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने परिसरातील अशुद्ध विहिरी आणि डबक्यातील पाण्याचा वापर नाईलाजाने करावा लागतो. कधी जवळच असलेल्या कारखान्यांमधून पाणी आणून तहान भागवावी लागते, असे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकाराकडे पंचायत समिती अधिकार्‍यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्त्री आणि पुरुष ग्रामस्थांनी पारंपरिक वेशात महिलानी हंडा तर पुरुषांनी हाती कावड घेऊन तहसीलदार कार्यालयातील पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. काकोळे गावाची पाहणी करून पाणी समस्येदिवर त्वरित तोडगा काढण्याचे ओशासन गटविकास अधिकारी शीतल कदम यांनी नागरिकांना दिले.