कडोंमपा झाली खिळखिळी, आली कर्ज घेण्याची पाळी!

कल्याण,दि.१४(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती ढासळलेली असल्यामुळे चालू आर्थिक वर्षात कोणतेही भांडवली काम हाती घेता येणार नाही. इतकेच नव्हे तर पुढील आर्थिक वर्षात म्हणजे सन २०१८ -२०१९ या कालावधीतही कोणतेही नवीन काम प्रस्तावित करता येईल, अशी शक्यता नाही. उद्या (शुक्रवारी) होणार्‍या सर्वसाधारण सभेत पटलावर ठेवण्यासाठी आयुक्त पी. वेलरासू यांनी सद्यस्थिती दर्शविणारा आर्थिक अहवाल तयार केला आहे. त्यावरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येत आहे. आयुक्तांनी आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की सन २०१७-२०१८ कोणतेही नवीन भांडवली काम हाती न घेता आवश्यक निधीसाठी तब्बल ३४७ कोटी रकमेची तूट निर्माण होणार आहे. एवढेच नाही तर पुढील आर्थिक वर्षात म्हणजे सन २०१८-२०१९ मध्ये सुद्धा कोणतेही नवीन काम प्रस्तावित न करताही ३६५.५० कोटी रुपयांची तूट निर्माण होणार आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, महत्वाच्या योजनांसाठी चालू आर्थिक वर्षात २८५ कोटी इतका निधी द्यावा लागणार आहे. प्रत्यक्षात मात्र ५१.५४ कोटी रुपयेच देता येणे शक्य आहे. निर्माण होणारी तूट नवीन कर्ज वा अन्य मार्गाने भरून काढावी लागेल. तसेच उर्वरित आवश्यक निधी पुढील आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे लागणार असेही वेलरासू यांनी म्हटले आहे. भांडवली कामाच्या दायित्वाचा तपशिल असा शहर अभियंता आणि जल अभियांता यांनी दिलेल्या कामांचे शिल्लक दायित्व अनुक्रमे २७५ कोटी आणि १६ कोटी असे एकूण २९१ कोटी इतके आहे. तसेच शहर अभियंता यांच्याकडील निविदा स्तरावरील कामांचे संभाव्य दायित्व १८३ कोटी आहे. शिवाय प्रशासकीय मान्यता असलेल्या परंतु निविदा काढणे शिल्लक असलेल्या कामांचे संभाव्य दायित्व ४६४ कोटी आहे. आजमितीस लेखा विभागाकडे सुमारे ५२ कोटींची देयके निधी अभावी प्रलंबित आहेत.