डोंबिवलीचा राज शेठ सीए परीक्षेत देशात पहिला

मुंबई,दि.१८-द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाद्वारे मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत डोंबिविलीच्या राज शेठ या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे. राज शेठला सीएच्या परीक्षेत ७८.७५ टक्के गुण मिळाले. ८०० गुणांच्या परीक्षेत राजने ६३० गुण मिळविले आहेत. ७८.७५ टक्के मिळवत सीएच्या परीक्षेत राज देशात पहिला आला आहे. परीक्षेत केलेल्या कामगिरीमुळे राजचे कौतुक होत आहे. मंगळवारी सकाळी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी राजच्या आई वडिलांचे अभिनंदन केले. मे २०१७ च्या सीएच्या परीक्षेत अगस्थीस्वरण एस. या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ८०० पैकी ६०२ गुण मिळाले आहेत. सीएच्या परीक्षेत ७५.२५ टक्के मिळवत अगस्थीस्वरण देशात दुसरा आला आहे. तर मुंबईचा कृष्णा पवन गुप्ता हा विद्यार्थी देशात तिसरा आला आहे. कृष्णाला ७५.१३ टक्के गुण मिळाले असून ६०१ इतकी त्याच्या गुणांची बेरीज आहे. विशेष म्हणजे अगस्थीस्वरण आणि कृष्णा या दोघांच्या मार्कांच्या टक्केवारीत फक्त ०.१२टक्क्यांचा फरक आहे. डोंबिवलीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवणार्‍या राजने परीक्षेसाठी खाजगी क्लास लावला होता. सुरुवातीला तो दररोज दोन तास अभ्यास करायचा. त्यानंतर अभ्यासाचे तास वाढविले. शेवटच्या महिन्यांमध्ये तो दररोज १२ तास अभ्यास करत होता. मेरीटमध्ये येईन याची मला खात्री होती. मात्र देशात पहिला येईन, असे वाटले नव्हते. अभ्यास खूप केला होता. पेपर चांगले गेले होते. निकाल लागला आणि मी पहिला आलो तेही देशात पहिला आलो हे कळल्यावर मला चांगले वाटले. माझ्याहीपेक्षा माझ्या मित्र मैत्रीणी, शिक्षक, कॉलेज, आई वडिल आणि माझ्या बहिणींना फार मोठा आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया राजने निकालानंतर दिली. राज डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रोडवरील महालक्ष्मी इमारतीत राहतो. त्याचे वडिल परेश हे डायमंड मार्केटमध्ये मुंबईला कामाला होते.ते निवृत्त झाले आहेत. आई ज्योत्स्ना ही गृहिणी आहे. त्याला दोन बहिणी आहे. त्यापैकी एक बहिण एमकॉम करीत आहे. तर दुसरी एमबीए शिक्षण घेत आहे. राजचे शालेय शिक्षण डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेत झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण माटुंगा येथील पोतदार कॉलेजमध्ये झाले. राजला गणित आणि अकाऊंट या विषयात रस होता. हे दोन्ही विषय त्याच्या आवडीचे असल्याने त्याने त्याच्या यशाच्या मार्ग ओळखला होता.