घर कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू; पाच जनावरे जखमी

शहापूर,दि.१३(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील डोळखांब भागातील मांजरे ग्रामपंचायत हद्दीतील पष्टेपाडा (क्र.२) येथे भर पावसात पहाटे २ वाजता बेडेघर अचानक कोसळल्याने शेतकर्‍याचा आणि एक बैल जबर जखमी झाल्याची घटना घडली. सावळाराम डोहळे (६५) असे मृत्यू पावलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. याआधीही वाडा तालुक्यातील सापने गावात अंगावर विजेची तार पडून शेतात काम करणार्‍या एका शेतकर्‍याचा आणि बैलाचा मृत्यू झाला होता. पष्टेपाडा गावलागतच या शेतकर्‍याचे जनावरांसाठी बेडेघर आहे. नेहमीप्रमाणे हा सावळाराम शेतकरी रात्री जेवल्यानंतर बेडेघरात जनावरांच्या देखरेखीसाठी झोपायला जातो, परंतु बुधवारी जोरात पडलेल्या पावसामुळे पहाटे साखर झोपेत असताना अचानक बेडेघर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक बैलाचा पाय मोडला असून इतर चार जनावरेही जखमी झाली आहेत. या शेतकर्‍याचे बेडेघर भुईसपाट झाले आहे. ऐन भात लावणीच्या वेळेस ही घटना घडल्याने पष्टेपाडा गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना घडल्याचे कळताच मांजरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनायक पष्टे आणि पोलीस पाटील दत्तात्रय वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. महसूलचे तलाठी आणि किन्हवली पोलिसांना कळविले आहे.या ठिकाणी तात्काळ पंचनामा करून शेतकर्‍याच्या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी माजी उपसभापती सुभाष हरड यांनी केली आहे.