भिवंडीत इमारत कोसळून चार ठार

भिवंडी,दि.२४(वार्ताहर)-भिवंडीत कल्याण रोडवर नवी वस्ती येथील अवघी दहा वर्ष जुनी तीन मजली इमारत आज पहाटे कोसळून चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी असून त्यांना ठाणे आणि भिवंडीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी इमारत मालक ताहिर बीजनौर यास अटक करण्यात आली आहे. टेमघर येथील सर्व्हे नंबर ३४ या वन खात्याच्या जमिनीवर सुमारे १० वर्षापूर्वी ही अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. प्रशासनाने या इमारतीस मालमत्ता क्रमांक ५१२ दिला होता. या इमारतीत सहा कुटुंबे रहात होती आणि तळमजला रिकामा होता. आज सकाळी ८.३० च्या सुमारास अचानक इमारत कोसळली आणि परिसरात एकच खळबळ माजली. भयभीत झालेल्या रहिवाशांनी दुर्घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले. पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकही दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. मृतांमध्ये रुक्सार याकुब खान (१८), अश्फाक मुस्ताक खान (३८) जैबुन्निसा रफिक अन्सारी (६१) आणि अन्य एकाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये रेहान खान (६), सलमा हन्सारी ७५५८, ख्वाजा मेहमूद सय्यद (५५), असिफ याकुब खान (२१), खान आबिद याकुब (२१), शकिल अल्लदिया अन्सारी (३७), याकुब युसुफ खान (५८), साबिरा याकुब पठाण (४५) आणिा इमराना खान (२) यांचा समावेश आहे. इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर जावेद दळवी, उपमहापौर मनोज काटेकर, अतिरीक्त आयुक्त अशोककुमार रणखांब त्याचप्रमाणे महापालिका आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची गर्दी वाढल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. मदतीसाठी स्थानिक रहिवाशांनी भाग घेतला होता. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांनीही घटनास्थळी पाहणी केली. या दुर्घटनेत रूखसार याकुब खान, अश्पाक अहमद युसूफ अहमद खान, परवीन बानो हे तिघेजण इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडले तर खाजा अहमद सैय्यद, रोहन गब्बर खान, सलमा ताहिर अन्सारी, हबीब याकुब खान, आसिफ याकुब खान, शाकीर अल्लाउद्दीन अन्सारी इ. जखमी झाले. या इमारतही दाटीवाटीच्या जागेत बांधल्याने मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा अनधिकृत इमारती दुर्घटनाग्रस्त होतात असा ठपका घटनास्थळी पाहणी करण्यास आलेल्या लोकप्रतिनिधींनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. महापालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींची तातडीने पाहणी करून धोकादायक आणि अतिधोकादायक अशा इमारतीत राहणार्‍या रहिवाशांना इमारतीबाहेर काढून ही इमारती जमीनदोस्त कराव्यात शिवाय जे बेघर होतील अशा रहिवाशांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे मोकळ्या जमीनीवर इमारत बांधण्यासाठी संबंधित मालकास परवानगी देऊन त्या त्या रहिवाशांना त्यांचा हक्क दिला जावा अशीही चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळाली.