एमआयडीसीला भोके पाडून बारवीची होते लूट

डोंबिवली,दि.३०(वार्ताहर)-बारवीची उंची आणि पाणीसाठा वाढूनही यंदा गतवर्षीपेक्षा पाणीसाठा कमी शिल्लक राहिला आहे. यामागे पाण्याची मागणी वाढल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र एमआयडीसीच्या जलवाहिनीला छिद्रे पाडून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाणीचोरीने हा अंदाज खोटा ठरवला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरी भागात मंगळवारी तर ग्रामीण भागात शुक्रवारी पाणीकपात लागू केल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उपनगरांना पाणीपुरवठा करणार्‍या एमआयडीसीच्या जलवाहिन्यांमधून वाहने धुणारे सर्व्हीस सेंटर आणि हॉटेलचालकांसाठी हजारो लिटर पाण्याची चोरी पाणी माफियांकडून होत असल्याचे दिसत आहे. मात्र यावर कारवाई करण्यात एमआयडीसीचे अधिकारी हतबल झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एमआयडीसीच्या तीन जलवाहिन्या बारवी धरणाच्या पायथ्यापासून नेवाळी नाका, बदलापूर, अंबरनाथ, खोणी गावाहून, कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई नाक्याजवळ आणण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये चोवीस तास पाणी भरुन वाहत असते. याच जलवाहिन्यांतून नवीमुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हानगर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या या जलवाहिन्या पाणी माफियांचे केंद्रस्थान झाले आहे. या जलवाहिन्यांतून दिवसाला हजारो लिटर पाणी चोरून त्याचा व्यावासायिक वापर केला जात आहे. अंबरनाथपासून शिळफाटा अशा सुमारे १० किलोमीटर परिसरात अनेक सर्व्हीस सेंटर आहेत. या ठिकाणी सेंटरचे चालक-मालक बिनधास्तपणे नजीकच्या जलवाहिनीला छिद्रे पाडून त्यामधून अनधिकृत नळजोडण्या घेऊन अनधिकृत व्यवसाय करत आहेत. शिवाय परिसरातील हॉटेल, ढाबे, खानावळ एमआयडीसीच्या या जलवाहिनीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अनेक ढाबे आणि हॉटेल्सना कोणत्याही प्रकारचे परवाने नसतानाही शासकीय यंत्रणांच्या डोळ्यांत धूळफेक करत त्यांचे धंदे अव्याहतपणे सुरू असल्याचे दिसत आहेत. टँकर माफियादेखील अपवाद राहिलेले नाहीत. एकीकडे पाण्याची उधळपट्टी सुरू असून दुसरीकडे सामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहेत. पाणीचोरीचा हा प्रकार एमआयडीसी प्रशासनाला माहिती असून व्यावसायिक आणि अधिकार्‍यांची ही मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण पट्ट्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहेत. दुसरीकडे मात्र एमआयडीसीच्या जलवाहिन्या फोडून सर्रास पाणी चोर्‍या होत आहे. दरम्यान बदलापूर जलवाहिनी रोड तसेच काटई टोलनाका परिसरात असलेले बहुतांश कार सर्व्हिस सेंटर, हॉटेल, ढाब्यांवरही राजकीय वरदहस्त असल्याने येथील व्यावसायिक एमआयडीसीच्या फुकटच्या पाण्याचा मनसोक्त वापर करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दोन वर्षापूर्वी बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर गेल्यावर्षी सर्वाधिक पाणीसाठा धरणात झाला होता.यंदाही पाणीसाठा वाढला, परंतु तरीही गतवर्षीपेक्षा सध्या पाणीसाठा कमी उरल्याचे दिसत आहे. ही घट वाढत्या मागणीमुळे नाही तर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाणीचोरीमुळे झाली आहे हे स्पष्ट झाले आहे.