भारत पेट्रोलियमच्या युनिटमध्ये भीषण स्फोट

मुंबई,दि.8- चेंबूर-माहुल येथील बीपीसीएल रिफायनरीमधील हायड्रो-क्रॅकर युनिटमध्ये आज झालेल्या बॉयलर स्फोटात 43 कर्मचारी जखमी झाले असून त्यातील 21 कर्मचार्‍यांना चेंबूरमधीलच इन्लॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एका कर्मचार्‍याची प्रकृती गंभीर असून त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. बीपीसीएल दुर्घटनेबाबत ताजी माहिती हाती आली असून दुपारी पावणेतीन वाजता हा स्फोट झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्फोटात एकूण 43 कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील 22 कर्मचार्‍यांवर बीपीसीएल प्रथमोपचार केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले तर अन्य 21 कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. काही कर्मचार्‍यांना फ्रॅक्चर झाले आहे तर काही जणांना गंभीर इजा झाल्याचे सांगण्यात आले. या सर्वांना इनलॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या आगीत कंपनीतील 200 ते 400 कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सर्वच कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तसेच आगीवर 70 टक्के नियंत्रण आणण्यात आले आहे. बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ, मुंबई पालिका आणि माझगाव डॉक अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.