चवताळलेल्या सैनिकांची पोलीस ठाण्यावर धडक

कल्याण,दि.४(वार्ताहर)-भीमा-कोरेगाव प्रकरणी कल्याणात बुधवारी आंदोलकांनी शिवसेना शाखेची तोडफोड केली होती. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत २२ शिवसैनिकांना ताब्यात घेतले. मंत्र्याच्या इशार्‍यावरून पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप करत आज शिवसेनेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर जोरदार धडक दिली. या वादाचा शिवसेनेचा काही संबंध नसून एसीपी वाडेकर यांनी अन्यायकारक कारवाई केल्याचे सांगत निलंबनाची मागणी केली. तसेच कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेने दिला आहे. डोंबिवलीच्या भाजपच्या एका मंत्र्यांच्या इशार्‍यावर हा पोलीस अधिकारी काम करतो त्याच्या इशार्‍याने शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीमार केला असा आरोप शिवसेनेने केला आहे. जमवाने शिवसेना कल्याण शहर शाखेवर हल्ला चढवला. याचे पडसाद कल्याण पूर्वेत उमटले. कल्याण पूर्वेत सिद्धार्थनगर आनंदवाडी परिसरात तणावाचे वातावरण पसरले. या ठिकाणी दोन गट आमने सामने आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलिसांनी शिवसेना कोळशेवाडी शाखेत घुसून शिवसैनिकांना शाखेबाहेर काढले त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आणि पोलिसांनी पुन्हा लाठीमार केला. या प्रकरणी पोलिसांनी २२ शिवसैनिकांसह १० भीम सैनिकांना ताब्यात घेतले. त्यानंतर कोळशेवाडी परिसरात गुरूवारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच परिसरात तणाव पूर्ण वातावरण होते. गुरूवारी सकाळी शिवसेनेच्या पदाधिकर्‍यांनी पोलीस स्थानकात धाव घेतल्याने एकच गर्दी झाली होती. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तर पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक असून डोंबिवलीतील भाजपाच्या एका मंत्र्यांच्या इशार्‍यावरून पोलीस अधिकारी रवींद्र वाडेकर यांनी ही कारवाई केली. त्यांचे निलंबन झाले नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा महानगरप्रमुख विजय साळवी यांनी दिला.