अंबरनाथ रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार

अंबरनाथ,दि.३१(वार्ताहर)-अंबरनाथ रेल्वे स्थानकावर येणारा प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेऊन खा.डॉ.श्रीकांत शिंदे सातत्याने मागणी करत असलेल्या होम प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला असून त्यामुळे अंबरनाथ स्थानकावरील गर्दीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. रेल्वेचे अधिकारी आणि शिवसेना पदाधिकार्‍यांसह खा.डॉ.शिंदे यांनी बुधवारी अंबरनाथ स्थानक येथे जाऊन होम प्लॅटफॉर्मच्या जागेची पाहणी केली. स्थानकाच्या पश्चिमेला होम प्लॅटफॉर्मसाठी लागणारी जागा उपलब्ध असून नगरपरिषदेकडून लागणारी सर्व मदत करण्याची ग्वाही खा.डॉ.शिंदे यांनी यावेळी दिली. पश्चिम दिशेकडील स्कायवॉक पादचारी पुलाला जोडण्याकरता नगरपरिषदेने पुढाकार घेऊन रेल्वेला आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी नगरपरिषदेच्या संबंधीत अधिकार्‍यांना यावेळी दिले. स्थानकातील कर्जत दिशेकडील एफओबीच्या रुंदीकरणाचा तसेच स्थानकात मध्यभागी नवीन एफओबीचा प्रस्ताव तयार करण्यासही त्यांनी रेल्वे अधिकार्‍यांना सांगितले. आमदार डॉ.बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंते श्री.यादव, एमआरव्हीसीचे सहायक अभियंते श्री.कुलकर्णी, नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विमल रॉय, स्टेशन मॅनेजर श्री.वानखेडे, आर पी एफ निरीक्षक एस.पी.सिंग आणि सुभाष ठाकूर, डेप्युटी स्टेशन मॅनेजर श्री.बनसोडे आणि अंबरनाथ नगरपरिषद शहर अभियंता श्री.भामरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. होम प्लॅटफॉर्म झाल्यास प्रवासी त्या बाजूने उतरून पश्चिमेला थेट जाऊ शकतील; त्यामुळे गर्दीच्या वेळी एफओबीवर येणारा भार कमी होईल, असे खा.डॉ.शिंदे म्हणाले. पश्चिमेला जागा उपलब्ध असून नगर परिषदेने सहकार्य केल्यास होम प्लॅटफॉर्म सहज होऊ शकतो, असे मत रेल्वेचे विभागीय अभियंते यादव यांनी व्यक्त केले. त्यावर, नगर परिषद सर्वतोपरी सहकार्य करील, अशी ग्वाही खा.डॉ.शिंदे यांनी दिली. होम प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृहासारख्या आवश्यक त्या प्रवासी सुविधांची तरतूद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. स्थानकाच्या पूर्व दिशेला, शिवाजी चौकाजवळ पावसाळ्यात पाणी तुंबते. यावर उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्र.३ ला समांतर वाहणारा नाला त्वरित रुंद करून नालेसफाई करण्याची सूचना खा.डॉ.शिंदे यांनी शहर अभियंते श्री.भामरे यांना केली. अंबरनाथ स्थानकात खा.डॉ.शिंदे यांच्या प्रयत्नांनी लवकरच दोन सरकते जिने बसवण्याचे काम सुरू होणार आहे. त्याचाही आढावा खा.डॉ.शिंदे यांनी घेतला. मुंबई बाजूकडील एफओबीवर एटीव्हीएम मशीन तातडीने बसवण्यात यावी, प्लॅटफॉर्म क्र.१ आणि २ वर स्वच्छतागृह करावे, तसेच बुकिंग ऑफिसमधील रेल्वे कर्मचार्‍यांना पिण्याचे पाणी आणि बसायला खुर्च्या उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही खा.डॉ.शिंदे यांनी रेल्वे अधिकार्‍यांना केल्या.