प्रभागातील पथदिवे बंद; संतप्त नगरसेवकाने अधिकार्‍याला कोंडले

अंबरनाथ,दि.१६(वार्ताहर)-प्रभागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास असलेल्या अंधाराची तक्रार करूनही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने नगरपालिकेतील विद्युत खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकून अधिकारी आणि कर्मचार्‍यांना तासभर कोंडून ठेवले. खुंटवली प्रभागातील शिवसेना नगरसेवक संदीप लोटे यांनी आज दुपारी टाळे ठोकले ठोकल्याने खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने काळोखाचे साम्राज्य पसरले होते. याबाबत वारंवार नगरपालिकेच्या विद्युत खात्याकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने अखेरीस विद्युत खात्याच्या कार्यालयाला नाईलाजाने टाळे ठोकावे लागल्याचे नगरसेवक श्री.लोटे यांनी सांगितले. रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने काळोखाचे साम्राज्य पसरलेले असते यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली होती. पथदिवे सुरु व्हावेत या मागणीकडे लक्ष पुरवावे यासाठी कार्यालयाला टाळे ठोकावे लागल्याचे नगरसेवक लोटे म्हणाले. या आंदोलनामुळे विद्युत खात्याचे अधिकारी राजेंद्र बोरकर आणि त्यांचे कर्मचारी त्यांच्या दालनात सुमारे एक तास अडकून पडले होते. खुंटवली प्रभागामधील बंद पथदिवे दुरुस्त करण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना दिल्या असून येत्या एक दोन दिवसांत पथदिवे सुरु केले जातील असे अंबरनाथ नगरपालिका विद्युत अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.