‘मनो’हारी राख्यांनी दिला रुग्णांना आत्मविश्‍वास

ठाणे,दि.6(वार्ताहर)-येत्या 26 ऑगस्टला रक्षाबंधन येत आहे. ठाण्यातील मनोरूग्णालयात रक्षाबंधननिमित्त एक विशेष उपक्रम राबवला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मनोरूग्णांनी राख्या बनवल्या आहेत. या उपक्रमाचा उपयोग थेरपी प्रमाणे केला जात असून रुग्णांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. दरवर्षी 300ते 400 राख्या मनोरूग्ण बनवतात. मनोरूग्णांनी बनवलेल्या राख्या स्वंयंसेवी संस्था विकत घेतात आणि संस्थेकडून मनोरूग्णांना आणि मनोरूग्णालयातील इतर कर्मचार्‍यांना त्या बांधल्या जातात. मनोरूग्णालयातील महिला रूग्ण राखीसह अनेक शोभेच्या वस्तू बनवतात. त्यांना या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. असे उपक्रम राबवण्याचा मुख्य उद्देश पैसे कमवणे नसून या उपक्रमांतून रूग्णांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. उपक्रमाचा उपयोग एक उपचार पद्धती(थेरपी) म्हणून केला जातो, असे ऑक्युपेशनल थेरपीस्ट रूपा किनकर यांनी सांगतले. राखी किंवा हस्तकलेच्या वस्तू बनवण्याचे साहित्य मनोरूग्णालयाकडून पुरवले जाते. राख्या बनवण्याव्यतिरिक्त मनोरूग्ण जुन्या कापडापासून पिशव्या, कागदी पिशव्या, फुलदाणी, पर्स, दिवे यांसारख्या शोभेच्या आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तू बनवतात. जुन्या कापडापासून पिशव्या बनवणे या उपक्रमाला आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे. दर महिन्याला 150 ते 200 पिशव्या मनोरूग्ण बनवतात. या कामासाठी मनोरूग्णावर सक्ती केली जात नाही. स्वेच्छेने मनोरूग्ण हे काम करतात. काही स्वंयंसेवी संस्थांकडून रूग्णांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत शोभेचे दागिने बनवणे, की-चेन बनवणे, पिशव्यांवर चित्र काढण्याचे प्रशिक्षण मनोरूग्णांनी घेतले आहे. या वस्तूंचे दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहात प्रदर्शन आयोजित केले जाते.