‘त्या’ ७२ कुटुंबांचे अखेर पूनर्वसन

डोंबिवली,दि.१(वार्ताहर)-डोंबिवली पश्चिमेकडील नागूबाई निवास या धोकादायक इमारतीला तडे गेल्यामुळे बेघर झालेल्या ७२ कुटुंबियांचे पुनर्वसन बीएसयूपीच्या घरांमध्ये करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे याप्रसंगी उपस्थित होते. श्री.शिंदे यांनी बुधवारी सकाळी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून बीएसयूपीच्या घरांमध्ये या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यास मंजुरी देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी मान्यता देताच दुपारी लगेच या कुटुंबियांचे बीएसयूपी प्रकल्पात पुनर्वसन करण्यात आले. याप्रसंगी महापौर राजेंद्र देवळेकर, गटनेता रमेश जाधव, नगरसेवक दीपेश म्हात्रे आदी उपस्थित होते. दिलेला शब्द खरा केल्यामुळे नागूबाई निवासमधील कुटुंबियांनी पालकमंत्री शिंदे यांचे यावेळी आभार मानले. गेल्या आठवड्यात जवळपास ३५ वर्षे जुन्या असलेल्या या धोकादायक इमारतीला तडे गेल्यामुळे या इमारतीतील ७२ कुटुंबे रस्त्यावर आली होती. यामध्ये वयोवृद्ध नागरिक, स्त्रिया आणि लहान मुले असून त्यांचे अतोनात हाल होत होते. काहींच्या घरी लग्न आहेत, कोणी आजारी आहेत, काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामुळे सगळेच हवालदिल झाले आहेत, त्यामुळे त्यांना माणुसकीच्या दृष्टीकोनातून बीएसयूपीच्या घरांमध्ये तातडीने सामावून घेणे आवश्यक असल्याचे श्री.शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. श्री.फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कारवाई करण्याचे निर्देश नगर विकास विभागाला दिले. या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा केल्याबद्दल श्री.शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये अनेक धोकादायक इमारती असून विविध विकास प्रकल्पांमुळे बाधित होणार्‍या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. अशा प्रकल्पबाधित तसेच, धोकादायक इमारतीतील नागरिकांना बीएसयूपीच्या घरात सामावून घेण्याविषयीचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने वर्षभरापूर्वीच नगर विकास विभागाकडे सादर केला असून त्यावर देखील तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे ओशासनही श्री.फडणवीस यांनी दिले.