-
स्पर्धेत भाग घेण्यासाठी पहा ठाणेवैभव
-
महाराष्ट्रातील एकमेव दैनिक ज्यांनी आपल्या वाचकांना दिल्या आजवर ५०० दागिना आणि ३०० साड्या.
-
दररोज दागिना जिंकायचा असेल तर वाचा ठाणेवैभव.
१८०० कोटींच्या अर्थसंकल्पाने केले डोंबिवलीचे ‘कल्याण’

कल्याण,दि.२८(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा सुमारे १८०० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात डोंबिवली शहरासाठी अनेक घोषणा करण्यात आल्याने यंदाचा
अर्थसंकल्प हा कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राकरिता न राहता डोंबिवलीपुरता मर्यादित असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगली आहे. स्थायी समितीने सादर केलेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचा स्थायी समितीचा एक हजार आठशे नऊ कोटी अठ्ठेचाळीस लाख जमा रुपयांचा अर्थसंकल्प महासभेच्या समोर स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी सादर केला. या अंदाजपत्रकात तब्बल ६५० कोटींच्या विकासकामाना कात्री लावण्यात आली आहे. प्रभागातील लहान-मोठी कामे करण्यात यावी यासाठी दिल्या जाणार्या नगरसेवक निधीतही कपात करण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती दामले हे डोंबिवलीचे रहिवासी असल्याने डोंबिवली शहरासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. यामध्ये डोंबिवलीतील प्रदूषणाची समस्या लक्षात घेता प्रदूषणाची पातळी किती आहे, हे एअर पोल्युशन इंडेक्स अभावी सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून हा ‘एपीआय’ उपलब्ध करून देत शहरात मोक्याच्या ठिकाणी डीजिटल डिस्प्ले उभारण्यात येतील. यासाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण शहरात तलावांची संख्या जास्त आहे त्यामानाने डोंबिवलीत तलावांची संख्या कमी आहे. असे असतांना डोंबिवली एमआयडीसी परिसरातील गणपती तलाव सुशोभीकरणासाठी २५ लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. कल्याणमध्येही अनेक तलावांची दुरावस्था असतांना केवळ डोंबिवलीतील एका तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी राखीव ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांना वाहन पार्किंगचा प्रश्न भेडसावत असतांना केवळ डोंबिवलीतील वाहन पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी टाटा पॉवर लेन खाली वाहनतळ देण्याचा मानस आहे. डोंबिवलीतील सुतिकागृह गेल्या पाच वर्षापासून बंद अवस्थेत आहे. या सूतिकागृहाला पुन्हा उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी तब्बल अडीच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डोंबिवलीतील मोठागाव गणेशघाटाच्या सुशोभिकरणासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिम येथे पाण्याची वितरण व्यवस्था सुरळीत होण्यासाठी झोनिंग करण्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. डोंबिवलीतील रामचंद्र नगर पाण्याची टाकी येथील वाडेभिंत, चेंबर आणि गोडाऊन बांधण्यासाठी १० लाखांची विशेष तरतूद आहे. डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर स्मशानभूमीचे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ७२ लाखांची तरतूद आहे. डोंबिवली मोठागाव स्मशानभूमीच्या नुतनीकरणासाठी ५० लाख, सर्वोदय मंगल कार्यालय ते एमआयडीसीपर्यंतचा रस्ता विकसित करण्यासाठी ५० लाख तर पंचानंद ते भोपरगावपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आयरेरोड डोंबिवली येथे जलकुंभ उभारणे आणि नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोपरपासून टिटवाळ्यापर्यंतचा परिसर आणि २७ गावांचाही समावेश आहे. टिटवाळा आणि २७ गावांतील प्रभागात कोणत्याही विशेष विकासकामांची तरतूद न केल्याने यंदाचा अर्थसंकल्प हा केवळ डोंबिवली शहरासाठी असून एकंदरीत सुमारे नऊ कोटी २७ लाखांच्या विकासकामांची तरतूद डोंबिवली शहरासाठी सभापती राहुल दामले यांनी अर्थसंकल्पात केली आहे. दामले हे आगामी विधान सभेसाठी डोंबिवलीमधील उमेदवार मानले जात असून ही निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दामले यांनी डोंबिवलीकरांना एकप्रकारे खुश केले आहे. तर याबबत सभापती राहुल दामले यांच्याशी ‘ठाणेवैभव’ च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता डोंबिवलीला जास्त योजना दिल्या या गोष्टीत तथ्य नसून स्मार्ट सिटीचा प्रकल्प हा कल्याण शहरात होत असल्याने डोंबिवलीतही विकास कामांचा समतोल राखला जावा यासाठी या कामाच्या तरतुदी केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.