हागणदारीमुक्त नवी मुंबईकरीता आयुक्तांच्या संकल्पनेतून ‘गुड मॉर्निंग पथक’

नवी मुंबई,दि.२२(वार्ताहर)-स्वच्छ नवी मुंबई मिशन अंतर्गत देशातील आठवे आणि राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई डनर मानांकीत असताना हे मानांकन उंचावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सतर्कतेने कार्यरत असून महापालिका आयुक्त् डॉ.रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली हागणदारीमुक्त नवी मुंबई ही संकल्पना कायम राखण्यासाठी महानगरपालिकेने गुडमॉर्निंग पथक ही अभिनव संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी दैनंदिन स्वच्छतेबाबत संबंधित विभागप्रमुख, सर्व विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व स्वच्छताविषयक अधिकारी विशेष आढावा बैठक घेऊन उघडयावर शौचास बसणार्‍या इसमांवर पूर्वीप्रमाणेच प्रभावी प्रतिबंध मोहिमा राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या व त्यावरील नियंत्रणाकरिता विभागवार गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करण्याचे निेर्देश दिेले होते. यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री.तुषार पवार आणि परिमंडळ-१ चे उपआयुक्त श्री.दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ-२ चे उप आयुक्त डॉ.अमरीश पटनिगीरे यांनी सार्वजनिक शौचालय व सामुदायिक शौचालय यांची देखभाल-दुरुस्ती व साफसफाई याबाबत तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. त्यादृष्टीने विभागाविभागात जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या गुड मॉर्निंग पथकाने १९ जूनपासून विभागनिहाय गांवठाण, झोपडपट्टी क्षेत्र, नाले व रेल्वे रुळास लागून असलेल्या जागा या ठिकाणी धडक मोहीमा राबवून उघडयावर शौचास बसणार्‍या इसमास पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत २६ हजार इतकी रक्कम वसूल केलेली आहे. अशाच प्रकारे साफसफाईनंतर रस्ते व पदपथावर कचरा फेकणार्‍या दुकानदार आणि नागरिकांवर कारवाई करीत १४ हजार ७५० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. यापुढील काळात एम.आय.डी.सी तील विविध कंपन्यांमध्ये येणारे ट्रक, टेम्पो यांच्यावरही धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. हे विविध ठिकाणाहून विशेषत्वाने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑईल, इंडियन गॅस अशा कंपन्यांचे इंधन व गॅस वाहून नेणारी वाहने तसेच इतर कंपन्यांमधील जड वाहने रस्त्याच्या कडेला त्यांचा नंबर येईपर्यंत रांगेत दोन-तीन दिवस उभे असतात. त्यांच्या प्रातर्विधीची सोय कंपन्यांनी केलेली नसते याकरीता प्रथमत: अशा कंपन्यांना त्यांच्याकडे येणार्‍या वाहनचालक व क्लिनर यांच्या करीता शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत पत्र दिले जाणार आहे. त्यानंतरही कंपनीने याविषयी योग्य ती पावले न उचलल्यास पर्यावरण कायदा १९८६ च्या कलम १६(१) अन्वये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र दिेले जाणार आहे. तसेच गुड मॉर्निंग पथकाव्दारे नवी मुंबई शहर नियमीत स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. नवी मुंबई शहराचे स्वच्छतेतील मानांकन उंचावण्यासाठी नवी मुंबईतील प्रत्येक नागरिेकाचे योगदान अपेक्षित असून स्वच्छतेवर निरीक्षण व नियंत्रण ठेवणार्‍या महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेतील गुड मॉर्निंग पथकाचे स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.