हलव्याचे दागिने ऑनलाईन

ठाणे,दि.११(वार्ताहर)-लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. याचसोबत लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. या दागिन्यांची ऑनलाईन मार्केटींग सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाली असून एक हजारपासून तीन हजारापर्यंत हे दागिने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. संक्रांतीची खास काळी साडी आणि पांढर्‍याशुभ्र हलव्याचे विविध दागिने अंगावर लेवून मिरवल्याशिवाय संक्रांतीचा सण साजराच होत नाही. नवविवाहितेसाठी तर हल्ली हलव्याचे खास दागिने बनवून घेतले जातात. या वर्षीही मकरसंक्रांतीसाठी हलव्याचे मंगळसूत्र, हार, झुमके, नथ, बांगड्या असे पारंपरिक अलंकार दुकानांमध्ये दाखल झाले आहेत. संक्रांतीत महिला आणि लहान मुलांना हलव्याचे दागिने घातले जातात. पूर्वी संक्रांत जवळ आली की हलव्याचे दागिने बनवण्याची लगबग सुरू होत असे. पांढर्‍या मोत्यांवर साखरेच्या पाकातून तयार केलेल्या हलव्याचे अलंकार घडवणे हे कौशल्याचे आणि चिकाटीचे काम आहे. त्यासाठी बराच वेळही द्यावा लागत असे. सध्याच्या धावपळीच्या काळात हे दागिने बनवण्याचा वेळ कुणाकडे नसतो, त्यामुळे हलव्याचे तयार अलंकार विकत घेण्याकडे महिलांचा कल जास्त आहे. हलव्याचे दागिने बनवून त्याची विक्री करणारे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असून त्यावरून दागिन्यांचे फोटोज अपलोड करून ऑर्डर घेत आहेत. याचसोबत हौशी गृहीणी घरीच यु ट्युबच्या माध्यमातून हे दागिणे बनवण्याचे धडे घेत आहेत. तयार दागिने ऑनलाईन घ्यायला गेल्यास हजार रुपयापासून दोन हजार रुपयांपर्यत उपलब्ध आहेत. तर बाजारपेठेत हजार रुपयापासून तीन हजारापर्यंत उपलब्ध आहेत. दागिन्यांच्या आकार आणि नगानुसार त्यांच्या किमंती कमी जास्त असल्याचे विक्रेत्या सुनिता वायचळ यांनी सांगितले. पूर्वी हलव्याचे मंगळसूत्र, बांगड्या, कानातले इतकेच बनवले जात असे, मात्र आता मंगळसूत्र, कंबरपट्टा, बाजूबंद, हार, मोहनमाळ, मेखला, पाटल्या, तोडे, अंगठी, नथ, कर्णफुले, वेणी, छल्ला आदींचा त्यात समावेश आहे. या दागिन्यांचा संच बनवून मिळतो. बाजारात महिला आणि मुलांच्या दागिन्यांची मागणी जास्त असल्याचे सौ.वायचळ यांनी सांगितले. ऑनलाईन मध्ये ओएलेक्स आणि रुचकर या साईट्सवर आकर्षक दागिने आहेत तर ठाणे बाजारपेठेतील दागिन्यांच्या दुकानांमध्ये हलव्याचे दागिने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.