समाजकल्याणमधून दलाल झाले हद्दपार

ठाणे,दि.13(वार्ताहर)-समाज विकास विभागाने विविध योजनेतील लोकोपयोगी वस्तूंचे वाटप न करता थेट लाभार्थींच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करून ठाणे महापालिकेतील दलालांची साखळी तोडली तर ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींना चांगलाच दणका दिला आहे. ठामपातील समाज विकास विभागातर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या अनुदानातून महिलांना शिलाई मशिन, घरघंटी, पापड मशीन, मिरची कांडप मशीन, शेवया मशीन, मसाला ग्राइंडर आदी विविध वस्तूंचे वाटप केले जात होते. त्याकरिता महापालिकेतर्फे ठेकेदाराची नियुक्ती केली जात होती. त्याद्वारे लोकप्रतिनिधी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार होऊन लाभार्थींना निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचे वाटप केले जात होते. परंतु महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि या विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी लाभार्थींना चांगल्या दर्जाच्या त्यांच्या पसंतीच्या वस्तू घेता याव्यात याकरिता त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम थेट जमा करण्याची योजना राबवली. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमा झाल्यामुळे गरजुंना त्यांच्या पसंतीची आणि उत्तम दर्जाची वस्तू घेता आली आहे. त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत असल्याची प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त श्री.चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या पैशातून विकत घेतलेल्या वस्तूंचे वाटप लोकप्रतिनिधी करत होते. त्यामुळे लाभार्थी त्यांच्या दबावाखाली होते. परंतु अनुदान थेट बँक खात्यात जमा होऊ लागल्याने लाभार्थींना कोणतेही दडपण राहिले नसल्याचेही श्री.चव्हाण म्हणाले. महापालिकेने दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी चार कोटी सात लाखांची तरतूद असताना त्यांना पाच कोटी 31 लाख 76 हजार 34 रुपये अनुदान दिले आहे तर महिला व बालकल्याण विभागाकरिता तीन कोटी 23 लाख 18 हजार 825 रुपये अनुदान त्यांच्या खात्यात थेट जमा केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.