संस्थांना दिलेल्या वास्तू ठामपा करणार सील !

ठाणे,दि.7(वार्ताहर)-विविध सामाजिक संस्थांच्या ताब्यात असलेल्या व्यायामशाळा, समाजमंदिरे,सील करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शिवसैनिक विरूध्द प्रशासन असा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. नगरसेवक, आमदार आणि खासदार निधीतून शहरात विविध ठिक्ाणी व्यायामशाळा, समाजमंदिरे बांधण्यात आली आहेत. या वास्तू सामाजिक संस्थांना देखभाल आणि वापराकरिता नाममात्र भाड्याने दिल्या आहेत. अशा 56 वास्तुची मुदत संपलेली आहे. त्या वास्तू ताब्यात घेऊन पुन्हा निविदा काढून रेडीरेकनर दराने दिल्या जाणार आहेत. त्यामुळे सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्‍यांत संतापाची लाट उसळली आहे. या संस्था बहुतेक शिवसैनिकांच्या आहेत. त्यांच्या ताब्यात या व्यायामशाळा असल्याने महापालिका प्रशासन विरूध्द शिवसैनिक असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काल भाजपाचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाच्या अधिकार्‍यांमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत ज्या संस्थांची मुदत संपलेली आहे अशा 56 संस्थांच्या फेरनिविदा काढून त्या रेडीरेकनर दराने विकसित करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. ठामपाने यापूर्वीही रस्ता रूंदीकरणात बाधित झालेल्या गाळेधारकांकडून रेडीरेकनर दराने कर वसूल करण्याच्या नोटीसा पाठवल्या होत्या. त्यावेळी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेत खटके उडाले होते. अखेर प्रशासनाला नोटीसा मागे घ्याव्या लागल्या होत्या. शहरातील महापालिकेच्या व्यायामशाळा नाममात्र दरात चालवल्या जात असल्याने गरिबांना त्याचा फायदा होतो आणि त्याची चांगली देखभालही होत असते. या व्यायामशाळा जर इतर संस्थांकडे गेल्या तर त्याची देखभाल योग्य होईल की नाही याची शाश्‍वती नाही त्यामुळे महापालिका प्रशासनाने सध्याच्या संस्थांनाच मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली जात आहे.