शेतकर्‍याला भेंडीचे 14 रुपये; ग्राहक मोजतो 60 रुपये !

ठाणे,दि.11(वार्ताहर)-भाज्या महाग होण्यामागे इंधन दरवाढ हे कारण दिले जात असले तरी प्रत्यक्षात दलालांच्या साखळीमुळे भाव तिप्पट होतात, अशी माहिती शहापूरच्या शेतकर्‍याने ‘ठाणेवैभव’ला दिली. शहापूरच्या शेतकर्‍याने मांडलेले हे भेंडीबाबतचे गणित खरोखरीच विचार करायला लावेल. एक किलो बियाणातून साधारणत: 80 किलो भेंडीचे पीक येते. ही भेंडी 14 रुपये किलो दराने विकली जाते. त्यातून 1120 रुपये शेतकर्‍यांच्या पदरी पडतात. भेंडीचे पीक महिनाभर घेता येते. दिवसाआड भेंडी काढण्यासाठी दोन मजूर लागतात. ते सरासरी 200 ते 250 रुपये मोबदला घेतात. बियाणाचा खर्च, खत, किटकनाशके, मजुरी असा सर्व मिळून दहा हजार रुपये खर्च येतो. एका एकरात साधारणत: 400 किलो भेंडी निघू शकते. याचाच अर्थ भेंडी किमान 24 ते 28 रुपये दराने विकली गेली तर शेतकर्‍याच्या मेहनतीचे चीज झाले असे म्हणता येईल. प्रत्यक्षात तसे होत नाही. शेतकर्‍याचे तर नुकसान होतेच, परंतु ग्राहकही किलोसाठी 60 रुपये मोजतो. यामुळे 46 रुपये फक्त दलालांच्या घशात जातात, असे हा शेतकरी म्हणाला. महागाईचे हे गुपित या शेतकर्‍याने उघड केले आणि शहरात सुरु असलेल्या आंदोलनांबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले. शहरात सध्या इंधनवाढीचे कारण पुढे करुन व्यापार्‍यांनी भाजीचे भाव वाढवल्याचे दिसून आले आहे. भाज्यांच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांनी खायचे तरी काय असा प्रश्‍न गृहीणी मिरा साळसकर यांनी उपस्थित केला आहे. गौरी-गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे लज्जतदार पदार्थ बनवले जातात. ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, असे ग्राहक अनिल जोशी यांनी सांगितले. आम्हाला मिळणारा भाजीपाला महागात मिळत असेल तर त्याप्रमाणे आम्ही त्याचे भाव वाढवतो, असे भाजीविके्रते मनोज शर्मा याने सांगितले. सर्वात जास्त भाव हिरव्या वटाण्याचे वाढले आहेत. याआधी हिरवा वाटाणा 50 रुपये प्रति किलोने विकला जात होता, तर आज वाटाण्याच्या दरात 90 रूपयांनी वाढ झाली आहे.