शाळेच्या दुसर्‍या मजल्यावरून पडून सहावीतील विद्यार्थिनी जखमी

अंबरनाथ,दि.१७(वार्ताहर)-शाळा सुरु असताना शाळेच्या दुसर्‍या मजल्यावरून खाली पडून सहावीमधील एक विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना अंबरनाथच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आज सकाळी १०च्या सुमारास घडली. अंबरनाथच्या फातिमा शाळेतील आशना दत्त ही विद्यार्थिनी शाळेच्या दुसर्‍या मजल्यावरील आपल्या वर्गाच्या व्हरंड्याच्या कठड्यावर बसली होती. मात्र अचानक आशनाचा तोल गेला आणि ती दुसर्‍या मजल्यावरून तळमजल्याच्या उपहारगृहाच्या छतावर कोसळली. उपहारगृहात बसलेल्या शाळेतील शिपायांना कसला तरी आवाज झाल्याने ते धावत बाहेर आले. तेव्हा त्यांना आशना पडल्याचे लक्षात आले त्यांनी लगेच जखमी अवस्थेतील आशनाला शाळेसमोरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.अशानाच्या पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी तिला मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून शाळेच्या परीक्षा सुरु आहेत. आशनाच्या वर्ग शिक्षकांनी आज बुधवारी तिच्या पालकांना शाळेत बोलावले होते , त्यामुळे आशना मानसिक तणावाखाली होती. याच तणावातून ती बसलेल्या व्हरांड्यातील कठड्यावरून तिचा तोल गेल्याने ती खाली कोसळली असल्याचे समजते. वर्ग शिक्षकांनी आशनाच्या पालकांना शाळेत का बोलावले याचा उलगडा झाला नाही, शाळेमधील सीसी टीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.