शहराध्यक्षांच्या हकालपट्टीचा ठराव करणार्‍या बदलापूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष देशमुख यांचा पलटवार

बदलापूर,दि.२१(वार्ताहर)-आंदोलने करताना विेशासात घेतले जात नाहीत आणि मनमानी कारभाराच्या कारणावरून बदलापूरच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांची हकालपट्टीची मागणी करण्याच्या ठराव करणार्‍या पक्षाचे बदलापूर शहर सरचिटणीस आणि उपाध्यक्ष यांची पदावरून हकालपट्टी करून शहराध्यक्षांनी पक्षतील हितशत्रूंवर पलटवार केला आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शहराध्यक्ष देशमुख यांनी शेतकर्‍यांच्या मागण्याची पूर्तता होत नसल्याच्या कारणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल पोलिसांनी घेतली आणि श्री.देशमुख यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकार्‍या विरोधात गुन्हे दाखल झाले होते, आंदोलन करताना देशमुख पूर्वपरवानगी घेत नाहीत तसेच पदाधिकार्‍यांना विेशासात घेत नाहीत असे कारण देत पक्षाचे शहर उपाध्यक्ष संजय कराळे आणि सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी पुढाकार घेऊन मागील आठवड्यात बोलावलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकीत शहराध्यक्ष देशमुख यांना बदलण्याचा ठराव मांडला. या ठरावावर राष्ट्रवादीचे पालिका गटनेते आशिष दामले, नगरसेविका वंदना सावळे, प्रदेश महिला संघटक सचिव अनिता नवले आदी सदस्यांच्या ठरावावर सह्या घेण्यात आल्या होत्या. या ठरावाच्या प्रति पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांकड़े पाठवण्यात आल्या. पक्षाच्या वतीने घेण्यात येणार्‍या कार्यक्रमाचे आमंत्रण पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सोशल मीडियाद्वारे पाठवण्यात येते याशिवाय प्रत्यक्ष भेटीमध्ये अथवा फोनवरून चर्चा केली जाते त्यामुळे पदाधिकार्‍यांना विेशासात घेतले जात नाही या आरोपात तथ्य नाही, पक्षांतर्गत बाबी चव्हाट्यावर येत असल्याने उपाध्यक्ष जाधव आणि सरचिटणीस कराळे यांची पदावरून हकालपट्टीचा ठराव राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने एकमताने मंजूर केल्याचे श्री.देशमुख यांनी संगितले. आंदोलनापूर्वी रीतसर परवानगी घेऊनच आंदोलन केले जाते आणि पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यास कार्यकर्ते डगमगून जात नाहीत, शहरात पक्षाच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनाची पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतल्याची आठवण श्री.देशमुख यांनी करून दिली.