वृक्षारोपण नव्हे लोकचळवळ!

कल्याण,दि.1(वार्ताहर)-राज्यात 13 कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ रविवारी सकाळी कल्याणजवळील वरप गाव येथून झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आजचा दिवस हा भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा दिवस असून वृक्षलागवड कार्यक्रम आता लोकचळवळ झाली आहे. राज्यभरात सुरू असलेली वृक्षारोपण मोहीम अत्यंत प्रामाणिकपणे व लोकसहभागातून चाललेली देशातील सर्वात मोठी मोहीम असल्याचे सांगत 50 कोटीहून जास्त वृक्षारोपण होईल असा विेशास व्यक्त केला. 13 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ मुरबाड रोड वरप गाव येथील राधा स्वामी सत्संग आश्रमामागील वन विभागाच्या जागेवर झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार नरेंद्र पवार सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, पतंजलीचे बालकृष्ण आचार्य, सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ढासळत्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याची संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी मांडली. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा दिवस आहे. पर्यावरण संरक्षणकरता राज्यात 50 कोटी वृक्ष लावायची संकल्पना सुधीर मूनगुंटीवार यांनी मांडला. 33 टक्के वन आच्छादनकरता 400 कोटी वृक्ष लावायची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आतापर्यंत लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाचे जिओ टॅगिंग करण्यात आले असून त्या प्रत्येक झाडाची नोंद वन खात्याकडे असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. हरित महाराष्ट्राचे पाहिलेले स्वप्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.