विजयनगरीचा पाणीप्रश्‍न सुटला

ठाणे,दि.9(वार्ताहर)-मागील 15 वर्षांपासून पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या घोडबंदर मार्गावरील विजयनगरी गृहनिर्माण संस्थेमधील सात इमारतींच्या नागरिकांना दिलासा मिळाला असून त्याची पाणीटंचाई दूर करण्यास भाजपाच्या नगरसेविकेला यश आले आहे. विजयनगरीमधील इमारत क्र.10, 11, 12, 19, 20, 21 आणि 22 या इमारतींमधील नागरिक मागील 15 वर्षांपासून पाणी टंचाईने ग्रस्त होते. त्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना खाजगी टँकरवर अवलंबून रहावे लागत होते. त्याबाबत भाजपाच्या स्थानिक नगरसेविका अर्चना मणेरा यांनी सतत पाठपुरावा करून या इमारतींना भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्‍न मार्गी लावला. या भागातील नागरिकांना मागील आठवड्यात भरपूर पाणीपुरवठा होऊ लागला. त्यांनी अर्चना मणेरा आणि डॉ. किरण मणेरा यांचे आभार मानले आहेत. नगरसेविकेने दखल घेतल्यामुळेच गृहनिर्माण संस्थेला महापालिकेकडून योग्य दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे. या भागातील गृहनिर्माण संस्थांची खाजगी टँकरवाल्यांच्या तावडीतून सुटका झाल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली. सौ.मणेरा यांचा गृहनिर्माण संर्स्थेच्या अध्यक्षा शिल्पा मॅडम, सरचिटणीस श्री. जंगम, संतोष पाठारे आणि वसंत खरटनहार यांनी आभार मानले.