वनवास संपला; तिजोरी ताब्यात

ठाणे,दि.१६(वार्ताहर)-संख्याबळ असतानाही १४ महिने ठाणे महापालिकेच्या तिजोरीपासून दूर राहिलेल्या शिवसेनेला अखेर आज महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या मिळविण्यात यश आले. स्थायी समितीच्या सभापतीपदी राम रेपाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज झालेल्या सभेत राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी दांडी मारल्यामुळे सभागृहात विरोधाची धार कमी झाली. महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहेत, परंतु स्थायी समितीमध्ये मात्र त्यांच्याकडे १६ पैकी आठ इतके संख्याबळ आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे पाच आणि भाजपाकडे तीन संख्याबळ असल्याचे तौलनिक संख्याबळ कोकण विभागीय आयुक्तांनी जाहीर केल्यानंतर सेनेने त्याला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे १४ महिने स्थायीची निवडणूक लांबली होती. आज मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक झाली. या पदाकरिता भाजपाचे नारायण पवार आणि शिवसेनेचे राम रेपाळे यांच्यात सरळ लढत होती. निवडणूक सुरू झाली असताना राष्ट्रवादीच्या चार सदस्यांपैकी एकमेव उपस्थित असलेल्या नजीब मुल्ला यांनी निवडणूक प्रक्रियेला विरोध दर्शवला. कोकण विभागीय आयुक्तांनी जे तौलनिक संख्याबळ दिले आहे त्यानुसार ही निवडणूक होत नाही. या समितीवर निवडलेले सदस्यच बेकायदेशीर असल्याचा आक्षेप श्री.मुल्ला यांनी नोंदवला होता, परंतु निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचे कारण देत पिठासीन अधिकार्‍यांनी त्यांचा आक्षेप फेटाळून लावल्याने मुल्ला यांनी सभात्याग केला, तर भाजपाच्या पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे अखेर रेपाळे यांची पिठासीन अधिकार्‍यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे चार सदस्य आहेत. या निवडणुकीला त्यांचा विरोध होता, परंतु मुंब्य्रातील तीनही सदस्यांनी निवडणुकीस दांडी मारली. त्यामुळे विरोधकांच्या विरोधाची धार कमी झाली. या सदस्यांनी निवडणूक किती वाजता आहे याचीदेखील कल्पना नव्हती. राष्ट्रवादीकडे नियोजनाचा अभाव असल्याचे आजच्या बैठकीत जाणवले, तर राष्ट्रवादीने न्यायालयात आव्हान दिले आहे. पक्षाने कोणती भूमिका घ्यायची हे जाहीर केले नाही. पक्षाने कळवलेदेखील नाही. त्यामुळे या निवडणुकीस उपस्थित राहता आले नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सदस्य शानू पठाण यांनी दिली. श्री.रेपाळे यांची निवड झाल्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के आणि महापालिकेतील नगरसेवक पदाधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले. टेंभीनाका येथील आनंदाश्रम येथे जाऊन श्री.रेपाळे यांनी स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. श्री.रेपाळे यांच्या समर्थकांनी त्यांची निवड झाल्यानंतर महापालिका परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून ढोलताशे वाजवून एकच जल्लोष केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे पालघर येथील दौर्‍यावर असल्याने उपस्थित नव्हते. त्यामुळे श्री.रेपाळे यांनी स्थायी समिती कार्यालयातील खुर्चीवर न बसण्याचा निर्णय घेऊन एकनिष्ठतेचे उदाहरण दाखवून दिले आहे.