वडाळ्याची मेट्रो गायमुखपर्यंत जाणार

ठाणे,दि.१२(वार्ताहर)-वडाळा कासारवडवली मेट्रो मार्ग पुढे गायमुखपर्यंत नेण्यास यावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक गेल्या एक ते दीड वर्षापासून प्रयत्नशील होते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या बैठकीत वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्ग पुढे गायमुखपर्यंत नेण्यास मंजुरी दिल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे आणि एमएमआरडीचिे आभार मानले आहेत. वडाळा कासारवडवली मेट्रो मार्गाचे मुळात सर्वेक्षणच चुकीच्या पद्धतीने झाले असून, ठाणे शहराची हद्द ही कासारवडवलीपर्यंत नसून गायमुखपर्यंत असल्याने तसेच गायमुख परिसरात विकसित होत असलेली विकासकामे पाहता हा मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत नेणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर या मेट्रो मार्गासोबतच दहिसर, मिरा-भाईंदर मेट्रो मार्गालाही मान्यता देण्यात येईल असे ओशासन दिल्याची आठवणही त्यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली असून या मेट्रो मार्गाला लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मेट्रो मार्ग ४ अ हा कासारवडवली ते गायमुख हा सुमारे २.७ किमी. यामध्ये दोन नवीन स्थानके येणार आहेत. या मार्गासाठी सुमारे ९४९ कोटी रुपये खर्च होणार आहे. या मार्गामुळे सन २०२१मध्ये दीड लाख प्रवासी क्षमता वाढणार असून २०३१ मध्ये ही क्षमता एकूण १३.४४ लाख एवढी होणार आहे. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो ४ मार्ग ३२.३ किमीचा असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.