लोकांना बेघर करणारा विकासआराखडा चुलीत टाकू-उध्दव

उल्हासनगर,दि.१८(वार्ताहर)-‘उल्हासनगरचा विकास आराखडा विनाशकारी आहे. तीन लाख लोक बेघर होणार आहेत, व्यापार उद्ध्वस्त होणार आहे, असे होणार असेल तर ज्यारीतीने आम्ही मुंबईच्या डीपीला केराच्या टोपलीत टाकले, तसे उल्हासनगरचा विनाश करणारा डीपी फाडून चुलीत टाकू,’ असा इशारा उध्दव ठाकरे यांनी दिला. जेथे विकासकामांच्या फाईलींची चोरी होते तिथे विकास काय होणार?असा टोलाही श्री.ठाकरे यांनी लगावला. काल रात्री उशिराने शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन केल्यावर आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत ठाकरे बोलत होते.जेंव्हा निवडणुका जाहीर होतात तेंव्हाच भाजप ‘राममंदिर बनाएंगे’ अशी घोषणा करते, पण तारीख जाहीर करत नाही. सर्वच यंत्रणा तुमच्याकडे असताना तुम्हाला राममंदिर बनवण्यापासून कोण रोखते?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘पालघर निवडणुकीत भाजपने सर्वस्व पणाला लावले आहे. शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर पालघरच नाही राज्यातील सर्व निवडणुका आम्ही जिंकून दाखवू,’ असा निर्धार त्यांनी केला. भाजपा राजकारणाचा खालचा स्तर गाठत आहे. लोकशाहीच्या सिद्धांताचे धिंडवडे काढले जात आहेत असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. धिंडवडेच काढणार असाल तर निवडणुका घेताच कशाला?असा थेट सवाल करताना ‘राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या थेट नियुक्त्या करा, ईव्हीएम मशीनचा ताण देखील कमी होईल’ असा टोमणा देखील त्यांनी ठाकरे शैलीत भाजपाला मारला. ठाण्यात सुसज्ज असे रुग्णालय शिवसेनेने दिले आहे.त्याप्रमाणे उल्हासनगरला रुग्णालयाची भेट शिवसेना देणार असे ओशासन ठाकरे यांनी दिले. श्रीकांत शिंदे हे पेशाने डॉक्टर असले तरी ते हाडाचे शिवसैनिक असल्याने त्यांनी अवघ्या चार वर्षात विकास कामांची छाप सोडली, अशी शाबासकी देखील त्यांनी डॉ.शिंदे यांना दिली. यावेळी उल्हासनगरातील पहिला आयएएस अधिकारी झालेला आशिष रावलानी या विद्यार्थ्याचा जाहीर गौरव उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ठाणे-कल्याणमधील खासदार आमदार महापौरांसह शिवसेना नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ.बालाजी किणीकर, विरोधीपक्षनेते धनंजय बोडारे, गटनेते रमेश चव्हाण, ग्राहक संरक्षण कक्षाचे जयकुमार केणी, महिला संघटक मनीषा भानुशाली, युवासेनेचे सोनू चानपूर, बाळा श्रीखंडे, सुमित सोनकांबळे, रोजगार सेनेचे रविंद्र चव्हाण आदी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.