रुग्णालय आणि विद्यालयाचे राष्ट्रवादीने उरकले उद्घाटन!

बदलापूर,दि.३०(वार्ताहर)-गेल्या दोन वर्षांपासून बांधून पूर्ण असलेल्या पण उद्घाटनापासून वंचित असलेल्या बदलापूर गावातील सरकारी रुग्णालयाचे तसेच तंत्र विद्यालयाचे प्रतिकात्मक उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज उरकले. ठाणे जिल्हा परीषदेच्या वतीने सुमारे दीड कोटी खर्च करुन प्राथमिक उपचार केंद्र बांधण्यात आले. मात्र उद्घाटनाला ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांना वेळ मिळत नसल्याने प्रतिकात्मक उद्घाटन केल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख म्हणाले. बदलापूर गावातील प्राथिमक उपचार केंद्रामध्ये ग्रामीण भागातून रोज अनेक आदिवासी आणि गरीब नागरिक खाजगी दवाखान्यातील उपचार परवडत नसल्याने येतात. मात्र बांधून पूर्ण झालेल्या रुग्णालयात सोयी नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. त्यामुळे रुग्णालय त्वरित सुरु करून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी शहराध्यक्ष देशमुख यांनी केली. सरकारी रुग्णालयाला लागूनच अंदाजे चार कोटी ३६ लाख ७८ हजार रुपये खर्च करू बांधलेले शासकीय तंत्र विद्यालयही धूळखात पडून आहे, विद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन न केल्यामुळे बदलापूर हायस्कूलमध्ये भाडे तत्वावर तंत्र विद्यालय सुरु असून भाडे येण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल कालिदास देशमुख यांनी उपस्थित केला. शहराध्यक्ष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली युवक अध्यक्ष जितेंद्र पाटील, सेवादल अध्यक्ष हेमंत यशवंतराव, महिला अध्यक्षा अनघा वारंग, एन. डी. पाटील, हेमंत रुमणे, सागर देशमुख दिनेश धुमाळ, कविता पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले.