राष्ट्रसंत भय्युजी महाराजांची गोळी झाडून आत्महत्या

इंदूर,दि.१२-आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली. राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली. इंदूरमध्ये भय्यू महाराजांचं मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. चार वर्षांपूर्वी भय्यू महाराज यांच्या वडिलांचं आणि २ वर्षांपूर्वी पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ हरवलं होतं. त्यामुळे त्यांच्या आई आणि बहिणींनी लग्नासाठी त्यांच्यामागे तगादा लावला होता. अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर भय्यू महाराज पुन्हा लग्नबंधनात अडकले होते. भय्यू महाराज यांनी २०११ साली लोकपाल आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णा हजारेंचं आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने भय्यू महाराजांनी दूत म्हणून पाठवले होते. तसेच, गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सद्भावना उपवास सोडण्यासाठी भय्यू महाराज यांना बोलावले गेले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, लता मंगेशकर, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी इत्यादी अनेक दिग्गज भय्यू महाराजांच्या आश्रमात जाऊन आले आहेत.